
मुंबई, ४ मे : एका बाजूला कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून परस्पर संपर्क टाळण्यावर राज्यात भर देण्यात येत आहे. मात्र, शिधावाटप दुकानातून धान्य देताना पूर्ववत ई पाॅस मशिनचा वापर करण्याचे आदेश केंद्राच्या सांगण्यावरून राज्य सरकारने दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार संसर्गजन्य असल्यामुळे शिधावाटप दुकानातून ई पाॅस मशीनचा वापर करणे म्हणजे या रोगाच्या प्रसाराचा मार्ग मोकळा करून देण्यासारखे होणार अाहे, त्यामुळे याबाबतचे आदेश त्वरित स्थगित करण्यात यावेत, अशी मागणी जनता दल (से) पक्षाने केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवून पक्षाने ही मागणी केली आहे.
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर देशात आणि राज्यातही संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे गरीब आणि गरजूंना धान्य पुरवठा करण्यासाठी शिधावाटप दुकानांची मदत घेण्यात आली. मात्र, कोरोना विषाणूचे संसर्गजन्य स्वरूप लक्षात घेऊन ई पाॅस मशीनच्या माध्यमातून बायोमेट्रिक नोंदणी स्थगित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र, याचा फायदा घेऊन काही दुकानदारांनी धान्याची अफरातफर केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बहुधा त्यामुळेच केंद्र सरकारने मे महिन्याचे धान्य वाटप करताना पुन्हा ई पाॅस मशीनचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या २७ एप्रिल रोजीच्या परिपत्रकानुसार शिधावाटप दुकानदारांनी मे महिन्याचे धान्य वितरित करताना, ई पाॅस मशीनचा वापर करावा, असे म्हटले आहे.
आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना या आदेशात असल्या तरी व्यावहारिक पातळीवर त्या अंमलात येणे अवघड आहे. कारण, शिधा घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने ई पाॅस मशीनवर अंगठा उमटविण्यापूर्वी हात निर्जंतुक करायचा आहे. तसेच प्रत्येक वेळी दुकानदाराला मशीनही निर्जंतुक करावी लागणार आहे. शिधावाटप दुकानावर होणारी गर्दी लक्षात घेता, प्रत्यक्षात अशी काळजी घेतली जाणे अवघड आहे. त्यामुळेच शिधावाटप दुकानदारांच्या संघटनेने दुकानेच बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे सद्यस्थिती लक्षात घेऊन तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ई पाॅस मशीनचा वापर करण्याचे आदेश राज्य सरकारने स्थगित करावेत आणि मुठभर दुकानदारांच्या चुकीची शिक्षा, राज्यातील जनतेला देऊ नये, अशी विनंती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. शरद पाटील, राष्ट्रीय महासचिव न्या. बी जी कोळसे पाटील, राज्याचे प्रधान महासचिव प्रताप होगाडे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ पी डी जोशी पाटोदेकर, महासचिव अझमल खान, युवा अध्यक्ष नाथा शेवाळे व अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीला दीड महिना होत आला तरी राज्यात अनेक गरजू आणि गरीब समाज घटकांना अन्नधान्याचा पुरवठा होऊ शकलेला नसून त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विना रेशन कार्ड मजूर, कष्टकरी तसेच परप्रांतीय मजूर, कामगार यांची संख्या लाखांमध्ये आहे. आज हे सर्व गरीब कामगार उपाशी पोटी पायी चालत गाव गाठायचा प्रयत्न करीत आहेत. अजूनही लाखो गरीब कष्टकरी लॉकडाऊनच्या ठिकाणीच आहेत. या सर्वांची अन्नधान्याची सोय झालेली नाही. तसेच कामाविना त्यांना आणखी किती दिवस काढावे लागतील हेही अनिश्चित आहे. ही स्थिती लक्षात घेऊन सर्व गरीब कष्टकरी कामगार वर्गाला किंबहुना सद्यस्थिती ध्यानी घेऊन कोणताही भेदभाव न करता जो मागायला येईल, त्या प्रत्येकाला धान्य पुरवठा करण्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश जनता दल सेक्युलर पक्षाने केली आहे.
गरिबीच्या अंत्योदयी, प्राधान्यक्रमी, केशरी कार्डधारी, सफेद कार्डधारी अशा छटा न शोधता सरसकट सर्वांना, जो मागायला येईल त्याला, शिधावाटप दुकानातून धान्य देण्याची व्यवस्था करावी, कारण आज माणूस जगवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारने दामाजीपंतांच्या भूमिकेतून राज्याची गोदामे खुली करावीत आणि जनतेला जगवावे, असे आवाहन पक्षाने केले आहे.
















