
रत्नागिरी : गुन्हा इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजेच ई-मेल, स्पॅम, सायबर स्टॉकिंग, मॉर्फिंग, पायरसी, डेटा चोरी व हॅकिंग इत्यादी पध्दतीने केला जातो. तेव्हा, त्याचा समावेश सायबर क्राईम मध्ये होतो. सायबर गुन्हेगारी नवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा दुष्परिणाम आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.

तालुका विधी सेवा समिती, वकील संघ चिपळूण व न्यू इंग्लिश स्कूल, कनिष्ठ महाविद्यालय सती चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी विद्यार्थ्यांना घटनेने दिलेले अधिकार व बालकांविषयी असलेल्या विविध कायद्यांच्या तरतुदींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. सध्याच्या शैक्षणिक पध्दतीतील बदल, विद्यार्थ्यांविषयक शासनाच्या विविध योजना, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्यातील बालकांच्या संरक्षणासाठीचे आदेश व मार्गदर्शक तत्त्व याबाबत सखोल माहिती दिली. दिवसेंदिवस वाढत जाणारे सायबर क्राईम सारखे गुन्हे व त्यामध्ये ओढली जाणारी तरूण पिढी याबाबत खंत व्यक्त करून माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध तरतुदींबाबत मार्गदर्शन केले.

मोबाईल, संगणक, टॅब, लॅपटॉप या अद्ययावत साधनांच्या आहारी जावून अगदी विद्यार्थी तरूण वर्ग सायबर गुन्ह्यात गुंतत चालला आहे व त्याला आळा घालण्यासाठी सदर कायद्यात कडक शिक्षेची तरतूद असल्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
सायबर गुन्हे मोठ्या संख्येने गुन्हे हे महिलांच्या बाबतीत घडत असतात. त्यामध्ये ई-मेल द्वारा होणारा लैंगिक छळ, सायबर पोर्नोग्राफी, सायबर बदनामी, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, धमकी देणे अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्याच्या समावेश होतो. त्यामुळे दिवसेंदिवस लैगिंक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत कायदेशिर चौकट पुरविण्याकरिता पोक्सो कायदा २०१२ अस्तित्वात आला. या कायद्यांतर्गत पोलिस स्टेशन, वैद्यकीय अधिकारी, सरकारी वकील, न्यायालये, सामाजिक संस्था व शाळा व्यवस्थापन यांची भूमिका काय असावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
चिपळूण उपाध्यक्ष तालुका वकील संघ यावेळी नयना पवार अॕड. यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व इंटरनेटचा वापर करताना घ्यावयाची काळजी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर समाजविघातक गोष्टींकरता न करता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शैक्षणिक विकासाकरिता करावा याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. वरेकर यांनी आभार प्रदर्शन केले. व तालुका विधी सेवा समितीच्या सौ. कासार व श्री. संचित कांबळे यांनी शिबीराचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका सौ. वारंग यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.