ठाणे : माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आज ठाणे जिल्हा परिषदेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार रवींद्र फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आजच्या या कृषी दिनी शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय हे देखील नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
२०१४ मध्ये कृषिभूषण पुरस्कार प्राप्त मुकाम पोस्ट आणे (ता. कल्याण) येथील मधुकर धर्माजी मोहोपे, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त मुक्काम पोस्ट वेहेळे (ता. भिवंडी) येथील माधुरी महादेव भोईर यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय कान्हा लोणे, कल्याण; विनायक पाटील आणि आकाश बरफ, भिवंडी; सदानंद सुरोशे, सुरेश हंबीर (अंबरनाथ), अमीत बसवंत, किसान पारधी (शहापूर), मोतीराम कडव, दत्तू शिद (मुरबाड) या शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती तसेच उत्तम प्रकारे भाजीपाला पिकविणे, शासनाच्या योजनांचा लाभ घेणेकृषी यांत्रिकीकरण, कृषी पर्यटन इत्यादी कारणांसाठी त्यांना गौरविण्यात आले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात शेतीमध्ये विविध प्रयोग झाले पाहिजेत तसेच केवळ भातावर अवलंबून न राहता भाजीपाला तसेच इतर पिके कशी घेता येतील हे पाहिले पाहिजे असे सांगितले. ठाणे जिल्ह्यात जलयुक्त शिवाराच्या कामांमध्ये लोक सहभाग मिळाला त्यामुळे ठिकठिकाणी तलावातील गाळ काढण्यात आले, परिणामत: पाणी साठा वाढला, असे सांगितले. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा देखील जास्तीत जास्त चांगला लाभ कसा करून घेता येईल, हे पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.
रब्बीचे क्षेत्र वाढेल
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांनी देखील आपल्या भाषणात जिल्हा परिषद शेती आणि शेतकऱ्यांसाठी राबवीत असलेल्या योजनांची माहिती दिली. जलयुक्तमुळे यंदा जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र यावेळी निश्चित वाढेल असेही ते म्हणाले.
याप्रसंगी कृषिविषयक पुस्तिकांचे लोकार्पण करण्यात आले. भाजीपाला लागवड, रोग नियंत्रण अशी माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते पीओएस मशीन्सचे वाटपाही करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी महावीर जंगटे, कृषी विकास अधिकारी डॉ प्रफुल्ल बनसोडे आदींची उपस्थिती होती