मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला असून शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा अभूतपूर्व निर्णय राज्य शासनाने घेतल्याबद्दल पुणतांब्यासह परिसरातील ४० गावातील शेतकरी बांधव मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी येथे आले होते. यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री पाटील व निलंगेकर यांचा सत्कार पुणतांबा येथील शेतकरी बांधवांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक अशी राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. राज्याने गेली दोन ते तीन वर्ष सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. आभाळच फाटलंय त्यातून खचून न जाता ते शिवण्याचे काम राज्य शासनाने सुरू केलं आहे. त्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य शासन तयार आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी शेती क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार केला आहे. शेतकरी कर्जमुक्त झाल्यावर मी खऱ्या अर्थाने समाधानी होईल. राज्य शासनामार्फत शेती व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेकविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कृषि पंपांना सौरऊर्जा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. दोन दुष्काळांचा सामना करू शकेल एवढे पाणी या माध्यमातून मिळाले आहे.
शेतीला शाश्वत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून राज्य शासन सामान्यांच्या प्रश्नांवर चर्चेद्वारे तोडगा काढत आहे. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचे मी आभार मानतो. शेतकरी खऱ्या अर्थाने कर्जमुक्त होणे हे अंतिम ध्येय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आज वर्षा निवासस्थानी पुणतांबा येथील शेतकरी बांधवांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफीच्या निर्णयाबाबत त्यांचे आभार मानले व त्यांचा सत्कारही केला. यावेळी धनंजय जाधव, संदीप गिड्डे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.