मुंबई : राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या प्रक्रियेबाबत राष्ट्रीयकृत बँकांना असलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी तसेच या प्रक्रियेदरम्यानच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची (एसएलबीसी) महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. बँकांनी राज्य शासनाच्या आवाहनाला पुढे येत सकारात्मक साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.
शासनाने कर्जमाफीबाबतचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरुन घेण्यासाठी सर्व स्तरावर यंत्रणा स्थापन केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील २५ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रांच्या’ माध्यमातून शेतकरी स्वत: किंवा इतरांच्या मदतीने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरु शकतील. तसेच अर्जाच्या छापील प्रतीही या केंद्रांवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. बँकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया राबविताना शेतकरी हिताचा विचार केला पाहिजे. जिल्हास्तरावर राज्य शासनामार्फत जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत प्रक्रिया विनाविलंब राबवावी. या प्रक्रियेत बँकांनी शेतकऱ्यांप्रती संवेदनशील भूमिका घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी विविध विभागाच्या सचिवांनी बँकांच्या प्रतिनिधींच्या शंकांना उत्तरे दिली. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शेतकरी कर्जमाफीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांसदर्भात निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात आतापर्यंत कर्जमाफीसंदर्भात करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. तसेच उपस्थित सचिवांकडून शंकांविषयी माहिती देत त्याअनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीची माहिती घेतली.
बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक तथा एसएलबीसीचे समन्वयक वसंत म्हस्के यावेळी उपस्थित होते.