मुंबई : राज्याचा यावेळचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या भरीव गुंतवणुकीची तरतूद करणारा आहे. तसेच राज्याच्या प्रगतीशीलतेबरोबरच शाश्वत कृषी विकासाला चालना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील कृषी क्षेत्र हे मदत व पुनर्वसनाकडून गुंतवणुकीकडे नेण्याच्या आमच्या धोरणाचे यंदाचा अर्थसंकल्प हा प्रतीक आहे. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी, विमा योजना आणि कृषी वीजपंपांना जोडणी यासारख्या राबविलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे यंदाच्या आर्थिक सर्व्हेक्षणात अनेक वर्षाच्या नकारात्मक वाढीनंतर प्रथमच सकारात्मक वाढ दिसून आली आहे. त्यामुळेच कृषी विकासाचा दर दोन आकड्यांपर्यंत पोहोचला आहे.
आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ग्रामविकास आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना करण्यासह युवक, महिला, आदिवासी तसेच वंचित-उपेक्षित घटकांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात दोन लाख घरांच्या निर्मितीची कामे सुरू करण्यात आली आहेत. विद्यमान सरकार स्थापन होण्यापूर्वी वीस वर्षात बांधली गेली नाहीत एवढी शौचालये दोन वर्षात बांधण्यात आली आहेत. परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरले असून मोठ्या संख्येने येणारे गुंतवणूकदार हे आमच्या धोरण आणि कार्यक्रमांवर विश्वास दाखवित आहेत.
कृषी व कृषी आधारित योजनांना पुढे नेण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. थकित शेतकऱ्यांना दिलासा देतानाच नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही आम्ही त्यात विचार करीत आहोत. मराठवाड्याच्या विकासासाठी कृष्णा प्रकल्पातून पाणी देण्यासाठी विशेष बाब म्हणून हा प्रकल्प राज्यपालांच्या सुत्राबाहेर ठेवण्याची विनंती राज्यपाल महोदयांना करण्यात आली आहे. हा प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील प्राधान्याने उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांना फायदा होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शेती आणि शेतकऱ्यांचा विचार करणारा अर्थसंकल्प मांडल्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आहे.