मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवन येथून करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कौशल्य विकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर उपस्थित होते.
या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील गातेगावातील शेतकऱ्यांनी या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. या प्रक्रियेमुळे गरजू शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी पोहोचण्यास मदत होईल. राज्यातील २५ हजार आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज स्वीकारण्याची सुरुवात झाली आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही २५ हजार रुपये प्रोत्साहनपर मदत देण्यात येणार आहे. अशाप्रकारे मदत देणारे हे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचता येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी पुरवणी मागणीद्वारे तरतूद करण्यात येणार आहे. आधारकार्ड बँक खात्याशी जोडणे महत्वाचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू यांनी या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती यावेळी दिली. तसेच माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांनी यावेळी तांत्रिक माहिती दिली.