मुंबई (विशेष प्रतिनिधी): अंधेरी पूर्वेतील शेर-ए-पंजाब कॉलनीतील नीलगिरी अपार्टमेंट जवळील शाळेत घुसलेल्या बिबट्याला तब्बल १२ तासांनी जेरबंद करण्यास नॅशनल पार्कच्या रेस्क्यू टीमला यश आले. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी एकच जल्लोष करत आंनद साजरा केला.
आरे कॉलनीच्या जंगलातून बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी भरवस्तीत घुसला. यावेळी जवळून जाणाऱ्या जॉर्ज किडनॅग यांच्या अंगावर त्याने उडी मारली. मात्र त्याचवेळी समोर असलेल्या पत्र्याला त्याची धडक लागली आणि तो खाली पडला. तो भिंतीच्या पलीकडे पडल्याने जॉर्ज यांचा जीव वाचला, असे त्यांचे म्हणणे आहे. बिबट्या घुसल्याची खबर हा हा म्हणता संपूर्ण परिसरात पसरली. मनात भीतीचे सावट असताना बघ्यांची तुंबळ गर्दी जमली. यामुळे त्याने प्लाट ५ मधील जूनियर क्रॉफ्टिंग केजी नर्सरीमध्ये प्रवेश केला. यावेळी भिंतीवर उडी मारताना पायाला तार तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांना देण्यात आली. ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू केली. तसेच खबरदारी म्हणून ठाणे वनक्षेत्राच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले. मात्र बिबट्या लपून बसल्याने पकडण्यास अपचण येत होती. दरम्यान, बोरिवलीतील नॅशनल पार्क वाइल्डलाइफ रेस्क्यू टीम सांयकाळी ५ वाजता घटनास्थळी दाखल होऊन, बिबट्याला बेशुद्धिचे इंजेक्शन दिले. यामुळे सायंकाळी ७ च्या वाजता म्हणजेच १२ तासांनंतर वन अधिकाऱ्यांनी जेरबंद करण्यास यश आले. बिबट्या जेरबंद झाल्याने शेर-ए-पंजाब कॉलनीतील नागरिकांनी निःश्वास सोडला.
घटनास्थळी पोचल्यानंतर आम्ही एक ते दीड तासात बिबट्यावर नियत्रंण मिळवले. बिबट्या लपून बसलेली जागा अडगळीची असल्यामुळे कारवाई करण्यास अडचण येत होती, असे बोरीवली संजय गांधी नॅशनल पार्कचे वन परिरक्षक अधिकारी शैलेश देवरे यांनी सांगितले.