डोंबिवली (प्रशांत जोशी) : प्रदूषण मंडळांने डोंबिवली औद्योगिक विभागातील कंपन्यांना क्लोजर नोटीस दिल्यामुळे येथील कंपनी मालक आक्रमक झाले आहेत. शासनाच्या या एकतर्फी निर्णय विरोधात कंपनी मालक एकत्रित जमले होते. कंपनी मालकांना योग्य न्याय मिळाला पाहिजे यासाठी एमआयडीसी कार्यालयावर त्यांनी शुक्रवारी मोर्चा काढला. कंपनी मालकांनी एमआयडीसी अधिकारी राजेश मुळे यांची भेट घेवून त्यांना कंपनी मालकांच्या मागणीचे निवेदन दिले.
मागील आठ दिवसांपूर्वी डोंबिवलीतील अमुदान रासायनिक कंपनीत रिऍक्टरचा स्फोट झाला होता. त्यामध्ये 12 जण मृत्युमुखी पडले तर नऊ जण अजूनही बेपत्ता आहेत. परिणामी शासनाने धोकादायक रासायनिक कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. याचाच भाग म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून येथील सर्वच कंपन्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षण अंतर्गत कंपन्यांना स्थलांतरीत करण्याच्या नोटीसही देण्यात येत आहे. तसेच येथील कंपन्यांचा वीजपुरवठा व पाणीपुरवठा बंद करा असे आदेश प्रदूषण मंडळाने एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिला असल्याची चर्चा आहे. या अशा निर्णयाच्या विरोधात कंपनी मालक एकत्रित येऊन एमआयडीसी कार्यकारीअभियंता यांना निवेदन दिले. एमआयडीसी अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने कनिष्ठ अधिकारी राजेश मुळे यांना आपले निवेदन देऊन आमच्या मागण्या संबंधित अधिकाऱ्यांना द्या अशी विनंती केली.
याविषयी कामा संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. देवेन सोनी यांनी सांगितले की, जर आमचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडले तर आम्ही जायचे कुठे. आमचे आणि आमच्या कामगारांचे भवितव्य काय ? जो अपघात झाला त्याबद्दल आम्हालाही दुःख होत आहे. या घटनेची कायदेशीर कारवाई होत आहे. पण जे कंपनी मालक निरपराध आहेत त्यांना वेठीस का धरण्यात येत आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून उद्योग चालवावेत असे संघटनेचे मत आहे. पण क्लोजर नोटीस देऊन अन्याय करत आहे येथील कामगारांचे भवितव्य काय कंपनी मालकांचे भवितव्य काय विचारणा कंपनी मालक करीत आहेत.