मुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकला. या मतदार संघात शेकाप- कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा दणदणीत विजय झाला. निवडणुकीत १० उमेदवार रिंगणात होते. पाटील यांनी सर्वांवर मात करत विजय मिळवला. त्यांना ११८३७ मते मिळाली. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ही निवडणूक झाली.
प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा पाटील यांना चार हजार १९७ मतांची आघाडी मिळाली. कोकण विभागातील ३४ हजार मतदारांपैकी ८२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रायगड जिल्ह्यात ९९ टक्के मतदान झाले.
बाळाराम पाटील हे शेकापचे नेते आणि रयत शिक्षण संस्था रायगड विभागाचे अध्यक्ष आहेत. कोकण विभाग मतदारसंघात शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांनी पुरोगामी शिक्षक आघाडीची स्थापना केली होती.
दरम्यान कोकणसह राज्यात इतर ठिकाणी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. त्याचे निकाल संमिश्र लागले औरंगाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. विक्रम काळे, अमरावती विभागात भारतीय जनता पक्षाचे डॉ. रणजित पाटील, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचे डॉ.सुधीर तांबे हे विजयी झाले.