रत्नागिरी : शेजाऱ्याने केलेल्या फावडा हल्ल्यात एक जण जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. संगमेश्वर तालुक्यातील बेलारी गावातील साप्तेवाडीत ही घटना घडली.
या घटनेत संदीप अर्जुन साप्ते (३०) हा युवक जागीच ठार झाला असून त्याची आई अरुणा अर्जुन साप्ते (५०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर संशयित आरोपी सखाराम बाबाजी साप्ते फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील मयत आणि संशयित आरोपी यांची बेलारी साप्तेवाडित शेजारी घरे आहेत. आज सकाळी संदीपचे वडील अर्जुन हे कामानिमित्त देवरुखला गेले होते. याचा फायदा घेत सखाराम बाबाजी साप्ते (५०) याने संदीपच्या घरात घुसून त्याला फावड्याने मारण्यास सुरुवात केली. यावेळी संदीपची आई अरुणा मधे पडली. सखारामने तिलाही फावड्याने मारहाण केली. दरम्यान संदीपवर फावड्याचे ५ ते ६ वार झाले यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. संदीप जाग्यावर पडल्यावर सखारामने आपल मोर्चा अरुणाकडे वळवला. या झटापटीत अरुणा या सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत.
संदीपच्या घरात सुरु असलेली गडबड ऐकून शेजारी धावले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. संदीप व त्याच्या आईला उपचारासाठी देवरुखला आणण्यात आले मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले तर अरुणा यांची जखम गंभीर असल्याने त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती समजताच देवरुख पोलिस निरीक्षक पाटील आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी सखारामचा शोध घेतला असता तो सापडला नाही.
रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम देवरुख पोलीस ठाण्यात सुरु होते. देवरुख ग्रामीण मध्ये शवविच्छेदनाची सोय नसल्याने संदीपचा मृतदेह विच्छेदनासाठी संगमेश्वरला पाठवण्यात आला होता.