मुंबई : शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सन 2015-16 मध्ये राज्य शासनाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम’ 22 जून 2015 रोजी जाहीर केला सुरु केला. आता याच कार्यक्रमातंर्गत राज्यातील 45 हजारहून अधिक शाळा प्रगत, 61 हजारहून अधिक डिजिटल तर 3 हजारहून अधिक शाळा आयएसओ 9000 प्रमाणित शाळा झाल्या आहेत.महाराष्ट्राचा शैक्षणिक वारसा कायम पुढे राहावा, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील शैक्षणिक सुविधा जागतिक दर्जाच्या व्हाव्यात, यासाठी राज्याच्या शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम म्हणजे शिक्षणाच्या नवीन क्रांतीची सुरुवात आहे. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम’ मुळे राज्यातील 45 हजार 676 शाळा प्रगत, 61 हजार 247 शाळा डिजिटल तर 3 हजार 325 आयएसओ 9000 प्रमाणित शाळा झाल्या आहेत.प्रत्येक मूल शिकले पाहिजे, या हेतूने शिक्षण संचालनालयामार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पायाभूत चाचण्यांचे आयोजन. वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या शिक्षणासाठीच्या मूलभूत क्षमता आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला त्या वेळीच प्राप्त व्हाव्यात, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का व्हावा हाच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वयोगटानुसार मुलभूत क्षमता किती प्राप्त झालेल्या आहेत याची पडताळणी या पायाभूत चाचण्यांद्वारे होते. या चाचण्यांचे वैशिष्ट्य असे, केवळ विद्यार्थ्यांचे वैयक्तिक मुल्यमापन किंवा त्याने/तिने किती गुण मिळवले हे तपासून पाहणे हे या चाचण्यांचे उदि्दष्ट नाही तर विद्यार्थ्याला नेमके किती समजले आहे, त्याला कोणता भाग अजिबातच कळलेला नाही, एखाद्या विषयातला नेमका कोणता भाग मुलांना समजायला अवघड जातोय, कोणता भाग जास्त सुलभ करुन शिकवणे आवश्यक आहे, हे शिक्षकांना या पायाभूत चाचण्यांच्या मुल्यमापनातून कळावे हा उद्देश आहे.एकही मूल शैक्षणिकदृष्ट्या अपेक्षेपेक्षा कमी असणार नाही यासाठी मुलांमधील मुलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुरुप अपेक्षित शैक्षणिक क्षमता संपादित केली आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याकरिता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधील मुलभूत क्षमता व शैक्षणिक पातळी ओळखण्यासाठी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. याकरिता इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या तीन शैक्षणिक प्रगमी चाचण्या घेण्यात येतात. ज्यामध्ये एक पायाभूत चाचणी व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामधील संकलित मूल्यमापनाच्या दोन चाचण्या घेण्यात येतात. या चाचण्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत घेण्यात येतात. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून शिक्षकांना आवश्यकतेनुसार व मागणीनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे.शालेय शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामुळे शैक्षणिक परिवर्तन होत आहे. शिक्षकांना आपलं काम करण्यासाठी अधिक स्वातंत्र्य या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक मूल प्रगत झालं पाहिजे, प्रगत होत जाणारं प्रत्येक मूल अप्रत्यक्षपणे राज्य आणि देशालाही विकसित आणि मजबूत बनवणार आहे आणि मुलं प्रगत झाल्यास शिक्षक म्हणून सर्वार्थाने ते आपल्या सर्वांचेच यश असणार आहे. आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत हाच संदेश शिक्षकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचवण्यात येत आहे. शिक्षकांना सतत प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे, त्यांच्या चांगल्या कामाचे आवर्जुन कौतुक करणे ही नवीन पद्धत ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाने रुढ केली आहे. प्रत्येक मूल शिकावे आणि शाळा प्रगत व्हावी, हे या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे ध्येय आहे, हे ध्येय कसे गाठायचे याचे स्वातंत्र्य अर्थातच शिक्षकांना देण्यात आले आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या तुलनेत ज्ञान रचनावादी शिक्षण पद्धती ही निश्चितच अधिक परिणामकारक असल्याचे दिसून येत आहे.