डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्वचारोग रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे त्वचारोग रुग्ण स्थानिक नसून कर्जत-कसारा परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात त्वचारोग तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे ग्रामीण विभागातील त्वचारोग रुग्णांची गर्दी मागील दोन महिन्यांपासून होत आहे अशी माहित शास्त्रीनगर रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर सावकारे यांनी दिली.
महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिलांचे आजार, त्वचारोग, डोळ्यांचे विकार, रक्तदाब आणि सर्दी-ताप आदींसाठी गोर-गरीब रुग्णांची गर्दी होत असते. त्वचारोग तज्ञ डॉ. संजय जाधव यांच्या विभागात दररोज सुमारे दीडशेहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणत वाढ झाल्यामुळे त्वचारुग्णांची संख्या अधिक आहे. मुळात त्वचारोग बरा होण्यास मोठा कालावधी लागत असल्याने रुग्ण पुन्हा-पुन्हा येत असतात. रुग्णालयात त्वचारुग्णांच्या संखेत वाढ होत असल्याने आणखी त्वचारोग तज्ञ डॉक्टरांची गरज आहे असे डॉ. जाधव यांनी सांगितले. पावसाळ्याला आता सुरुवात होत असून त्वचारुग्णांची अधिक भर होईल अशी दाट शक्यता आहे.
शास्त्रीनगर रुग्णालयात अद्याप स्त्रीरोग, बालरोग, सर्जन, रेडीओलॉजीस्ट व सोनोलॉजीस्ट, पॅथॉलॉजीस्ट, फिजीशीयन अशा 13 तज्ञ डॉक्टरांची गरज आहे. याशिवाय सहाय्यक प्रयोगशाळातंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, स्टाफनर्स, लिपिक, कक्षसेवक, आया, पुरुष-सफाई कामगार, वाहनचालक अशा सुमारे 150 पदे रिकामी आहेत. ही रिकामी पदे लवकरात-लवकर भरली गेली तर गोर-गरीब रुग्णांना अधिक चांगली सेवा देता येईल असेही डॉ. सावकारे यांनी सांगितले.