रत्नागिरी (आरकेजी): संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या दोन सख्ख्या बहिणी भरतीच्या पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी एकच्या दरम्यान हि घटना घडली. यापैकी एकीचा मृत्यू झाला असून दुसरी गंभीर आहे. तिला रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. पुर्वा विजय कांजिया ही मयत झाली असून ती आठ वर्षांची आहे. तर जयश्री विजय कांजिया हिच्यावर रत्नागिरीत उपचार सुरु आहेत. ती १२ वर्षांची आहे.
विजय कांजिया आपल्या कुटुंबियांसह संगमेश्वरमधील रामपेठ येथे राहतात. संगमेश्वर परिसरात मसाला विक्रीचा ते व्यवसाय करतात. त्यांच्या दोन मुली पुर्वा आणि जयश्री आज दुपारी साडेबाराच्या सुमारास शास्त्री नदीत आंघोळीसाठी गेल्या होत्या. यावेळी खाडीत भरती सुरु होती. यामुळे अचानक पाणी वाढू लागले. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोघीही खोल पाण्यात वाहू लागल्या. मुलींचा आरडाओरडा ऐकून शेजारच्या ग्रामस्थांनी पाण्यात उडी घेतली. पण तोपर्यंत पुर्वा खोल पाण्यात वाहून गेली तर जयश्री ग्रामस्थांच्या हाताला लागली. तिच्या नाका तोंडात पाणी गेल्याने तिला तत्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नंतर रत्नागिरीत हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या दोघीही बहिणी संगमेश्वर केंद्रशाळेच्या विद्यार्थिनी आहेत. दरम्याम या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.