रत्नागिरी : जिल्ह्यात ५ हजार ४६८ शस्त्र परवानाधारक असून या शस्त्रधारकांची आॅनलाईन माहिती भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. नोंदणीनंतर शस्त्रधारकांना युनिक क्रमांक देण्यात येणार आहे. स्वसंरक्षणासाठी परवाना घेतलेल्या परवानाधारकांची संख्या १ हजार ७८७ असून यापैकी केवळ १ हजार ४०८ जणांनीच आॅनलाईन नोंदणी केली असून आॅनलाइन नोंदणी न केलेल्या ३७९ जणांचा परवाना रद्दचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची ओळख निश्चित करण्यासाठी आधार नोंदणी सक्तीची झाली आहे. त्यावरूनच विविध सरकारी योजनांचे लाभ दिले जात असून त्यात मोठी पारदर्शकता आली आहे. बनावट नावावरून योजनांचे लाभ देणे बंद करण्यात आले आहे. याच धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणा-या शस्त्र परवान्याला युनिक आयडेंटीफिकेशन नंबर (युआयएन) देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने शस्त्र परवाना कायद्यात तरतुद केली असून यामुळे बनावट शस्त्र परवान्यांना आळा बसणार आहे. केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार शस्त्र अधिनियम १९५९ व शस्त्र नियम १९६२ नुसार सर्व शस्त्र परवान्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संकलीत केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षकांना शस्त्र परवानाधारकांच्या माहितीचा नमुना पुरवण्यात आलेला आहे. शस्त्रधारकांकडून हा नुमना अर्ज भरून घेण्यात आल्यानंतर माहितीची आॅनलाईन नोंद करून परवानाधारक शस्त्रधारकांना युनिक क्रमांक देण्यात येणार आहे. या युनिक क्रमांकावरून भविष्यात परवानाधारक शस्त्रासंबंधिची माहिती एका क्लिकवर त्वरीत उपलब्ध होणार आहे. यामुळे एका परवान्यावर अनेक शस्त्रे बाळगणा-यांना चाप बसणार आहे. अनेकांनी एका शस्त्र परवान्यावर एकापेक्षा अधिक शस्त्रे बाळगल्याची शक्यता आहे. परवान्यांच्या आॅनलाईन नोंदीमुळे अशा शस्त्रधारकांवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात ५ हजार ४६८ शस्त्र परवानाधारक आहेत. यापैकी स्वंरक्षणासाठी शस्त्र वापरणाºयांची संख्या १ हजार ७८७ च्या घरात आहे. यापैकी १ हजार ४०८ जणांनी आपली माहिती आॅनलाईन पध्दतीने भरली आहे. तर ३७९ जणांनी अद्यापही आपली माहिती आॅनलाईन भरलेली नाही. वारंवार सुचना देऊनही आॅनलाईन अर्ज न भरल्याने ३७९ जणांचे परवाने रददचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. शस्त्रधारकांचा शोध घेताना पोलीस विभागाची पुरती दमछाक उडाली आहे. अनेकजण जिल्ह्याबाहेर असल्याने नोंदणीत अडचण येत आहे.