मुंबई, दि. १३ : भारत जगाचे उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र बनण्याची क्षमता असलेला देश आहे. त्यासाठी भारताने नवीन प्रारुप स्वीकारण्याची गरज असून हे नवीन प्रारुप स्वीकारुन भारत यशस्वी होईल, असे जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी सांगितले.
बांद्रा येथील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये जी 20 परिषदेच्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठकीतील इन्फुसिंग न्यू लाईफ इनटू ग्रीन डेव्हलपमेंट या परिसंवादात श्री. कांत बोलत होते. कौन्सिल फॉर इन्व्हायरमेंट एनर्जी ॲण्ड वॉटरचे अरुणभा घोष यांनी श्री. कांत यांच्याशी संवाद साधला.
भारताची तंत्रज्ञान, उत्पादन, संगणक तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात जगातील महत्त्वाचे केंद्र बनण्याची क्षमता आहे. त्यादृष्टीने भारताला उत्पादन क्षेत्रात वाढ करावी लागणार आहे. तसेच, कार्बन उत्सर्जन न करता औद्योगिकीकरण करण्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारताला विकासाचे नवे प्रारुप स्वीकारण्याची आवश्यकता आहे. भारत त्यादिशेने वाटचाल करीत असल्याचे श्री. कांत यांनी सांगितले.
तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशांत इलेक्ट्रीकल व्हेईकलचा वापर करण्यावर भर देण्याचे जाहिर केले आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात भारत जीवाश्म इंधनमुक्त करण्याचा भारताचा मानस आहे. यादृष्टीने वाटचाल करण्यासाठी भारताला कार्बन उत्सर्जनाशिवाय विकासाची कास धरावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाला आपल्या वर्तनात आणि जीवनशैलीत बदल घडवावा लागणार आहे. भारत नेहमीच नवीन अर्थव्यवस्था, विकासासाठी नवीन आयाम शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांतूनच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य केले जाईल. विकासाच्या नव्या प्रारुपातूनच जागतिक विकासाला चालना मिळू शकेल, असा विश्वास यावेही श्री. कांत यांनी व्यक्त केला.