मुंबई : देशातील महत्वाची कामगार संघटना अशी ओळख असणाऱ्या हिंद मजदूर सभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शशांक राव यांची निवड करण्यात आली. सभेच्या कार्यकारिणीची नवी दिल्लीत बैठक झाली, या बैठकीत शशांक राव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती बेस्ट वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिली.
शशांक राव हे दिवंगत कामगार नेते शरद राव यांचे सुपूत्र असून कामगार चळवळीत त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तरुण, तडफदार, तसेच वेळप्रसंगी आक्रमक अशी त्यांची ओळख आहे. कामगारांचे प्रश्न सोडविताना समेटातून मार्ग काढून कामगारांना न्याय कसा मिळवून द्यावा, हे तंत्र त्यांनी आत्मसात केले आहे. त्यामुळेच त्यांची निवड झाली असल्याचे बोलले जात आहे. राव यांच्या निवडीबद्दल कामगार वर्गात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राव यांच्या प्रतीस्पर्ध्याना हादरा
नुकतीच शशांक राव यांनी द म्युनिसिपल युनियन ही संघटना स्थापन केली होती. यानंतर आता त्यांची हिंद मजदूर सभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याने राव यांच्या प्रतीस्पर्धी संघटनांना हादरा बसल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये वादावादी झाल्यानंतर राव यांना काढून टाकण्यात आले होते. यानंतर त्यांनी काढलेली संघटना आणि राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची झालेली निवड राव यांचे कामगार चळवळीतील स्थान अधिक भक्कम झाले आहे.