मुंबई: राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज दुपारपासून मागे घेत असल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या समन्वय समितीने आज मंत्रालयात जाहीर केले.आज दुपारी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्यासमवेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक असून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले. अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी दिली. त्यानुसार आणि मराठा आरक्षणासाठी असलेला बंद आणि रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून संप मागे घेत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौण्ड, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी, शिक्षक समिती, शिक्षक भारती, टीडीएफ, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र शिक्षकेतर कर्मचारीसंघटना, महाराष्ट्र कोतवाल संघटनेचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.