( सदर लेख राज्यातील ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी लिहिलेला असून अक्षरदान दिवाळी अंक 2024 मध्ये प्रसिद्ध झाला आहे. लेख लेखकाच्या परवानगीने आणि अक्षरदान च्या सौजन्याने (लेख आणि फोटो) येथे प्रकाशित करत आहोत)
मुंबईचा शरीर विक्रीचा सर्वात मोठा बाजार आधी एका ठिकाणीच होता. आता हा घाऊक बाजार बंद झालाय. पण मुंबई शहरात ठिकठिकाणी छोट्या-छोट्या मंडया सु्रू झाल्या आहेत. तिथं व्यवहार सुरूच आहेत. शरीराची किरकोळ बाजारपेठ पूर्ण शहरभर पसरली आहे. कसं उठलं हे एकेकाळचं कामाठीपुऱ्याचं साम्राज्य?
त्याला आता २० वर्षे झाली असतील. २००४ सालच्या सुमारास नामदेव ढसाळच्या बरोबर एके रात्री फोरास रोडच्या रेड लाईट एरियात फिरत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उत्तान वा अत्यंत कमी कपड्यातील तरुण मुली, बायका येणाऱ्या-जाणाऱ्याला खुणावत होत्या. पदर खाली टाकलेले, ब्लाऊजची निम्मी बटणं उघडी, काही जणी नुसत्या ब्रेसिअरवर, तरुण पोरींनी छोट्या शॉर्ट्स व स्कर्ट घातलेले. अंगप्रदर्शन हा या बाजाराचा नियमच. अंगभर कपडे असले तर पाहणार कोण त्यांना? काहींच्या हातात सिगारेट, काहींच्या हातात बिअरची बाटली. रस्त्यावरून चाललेलेही दारूच्याच तंद्रीत. साऱ्या आसमंतात दारू आणि सिगारेटचा वास पसरलेला. रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचरा घाणीची दुर्गंधीही त्या वासात मिसळलेली. बायांची लहान मुलं तिथंच खेळत होती. पोरांच्या मारामाऱ्या, बायांची एकमेकांशी भांडणं आणि आपापसात आई-बहिणीवरून शिवीगाळ. एक जण, बहुदा भडवा समोर येऊन बाजूच्या खिडकीकडे बोट दाखवत म्हणाला, ‘साब, चलो. एकदम नया माल आया है. आग्रा की लडकी है, आज सुबह ही आयी है. सिर्फ चौदा साल की. एकदम कडक माल है साब. मजा आएगा‘. बोलता बोलता अचानक त्याचं लक्ष बरोबरच्या नामदेव ढसाळकडे गेलं आणि तो दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ‘माफ करना साब, आप को देखा नहीं अंधेरे में. नही तो आता ही नाही आप के पास.’
चालत असताना काही बाया, काही हिजडे अंगावर येत होते. बायांनी गोरं आणि सुंदर दिसण्यासाठी, नव्हे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी केलेला भयंकर रंगीत मेकअप किळसवाणा वाटत होता. पण त्याशिवाय गिऱ्हाईक कसं मिळणार?
वेगवेगळ्या गल्ल्या बघत जात होतो. एक नेपाळी पोरी व बायांची गल्ली, एक आग्रा, इटावा, दिल्ली आणि आसपासच्या जिल्ह्यातील पोरीबाळी अधिक असलेली गल्ली. एका गल्लीतून जात असताना नामदेव म्हणाला, “ही गोऱ्या बायांची गल्ली.” हिचं नावच सफेद गल्ली आहे. ब्रिटिशांच्या काळात युरोपियन, जपानी बाया आल्या वा त्यांना इथं आणलं, ब्रिटिश सोल्जरांसाठी. त्यांना गोऱ्या बाया लागायच्या. नंतर तिचं नाव शुक्लाजी स्ट्रीट झालं. तसं तर फोरास रोडचं नावही पुढे रा. स. निमकर मार्ग असं झालं.
कामाठीपुऱ्यातील हा महत्त्वाचा रस्ता मात्र फक्त आणि फक्त ‘फोरास रोड’ म्हणून ओळखला जातो. तिथून जाताना पहिली गल्ली, दुसरी गल्ली अशा अनेक गल्ल्या लागतात. प्रत्येक गल्लीची ओळख तिथे धंदा करणाऱ्या मुली कोणत्या राज्यांतून आल्या आहेत, त्यानुसार ठरलेली. अशाच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश-तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, आसाम व ईशान्येच्या राज्यांतील मुली व बायांची गल्ली. मुंबईचा हा सर्वात मोठा रेड लाईट एरिया. जो पूर्वी ‘लाल बाजार’ नावानेही ओळखला जायचा. म्हणून झाला रेड लाईट एरिया.
गिरगांवातून भायखळ्याकडे या रस्त्यावरून बसने, टॅक्सीने अनेकदा गेलो. पण दिवसा. तेव्हा हा परिसर, रस्ता शांत व आसपासच्या गल्ल्या निपचित पडलेल्या असायच्या. रात्रभर शरीरविक्रीचा धंदा केल्यानंतर बहुतांशी बाया झोपलेल्या. काही कोठ्यासमोर रस्त्यावरच्या बाजेवर अस्ताव्यस्त कपड्यांत पहुडलेल्या. काही जणी ब्रशने वा मशेरीने दात घासत आहेत. हॉटेलच्या पोऱ्याने आणलेल्या प्लेटमधलं खाणं बाहेर उंबरठ्याशी बसून खाताहेत, गप्पात आई, बहीण, बाप, भाऊ सर्वांचा अत्यंत घाणेरड्या भाषेत उद्धार होतोय. बाजूला बीअर व दारूच्या बाटल्या पडलेल्या. काही जणी दलाल उगाच इथं तिथं सिगारेट, बिडी पीत फिरत आहेत, हे दृश्य असायचं.
रात्री घरासमोरचा लाल दिवा पेटला की धंद्याला सुरुवात. मुंबईची उभारणी प्रामुख्याने आंध्र प्रदेश व बाजूच्या कर्नाटकातील कामाठी लोकांनी केली. त्यांची वस्ती इथं होती, म्हणून हा कामाठीपुरा. त्यांनी आंध्र व कर्नाटकातील पोरी व बायांना पोटासाठी म्हणजे अर्थातच शरीरविक्रयाच्या धंद्यासाठी इथं आणलं. मग आंध्र, कर्नाटकला लागून असलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील बायांना आणलं गेलं. मुलीला देवाला वाहण्याची प्रथा होतीच आणि त्यामुळे आयुष्यभर कोणा ना कोणाबरोबर झोपायचं हेही ठरलेलं. त्यामुळे त्यांना व बलात्कारामुळे लग्न न झालेल्या आणि गावात इज्जत व जेवण न मिळणाऱ्या बायांना आणणं सोपं होतं. मग नेपाळ, चीनच्या बुटक्या, ईशान्येच्या राज्यातील आणि मग गोऱ्या बाया आल्या वा आणल्या गेल्या.
काही दुकानदार, पानाचे गादीवाले नामदेवला ओळख दाखवून सलाम करत होते. त्यांना हात करत नामदेव म्हणाला, “अरे माझं लहानपण, सारं आयुष्य या कामाठीपुऱ्यात गेलंय. इथली प्रत्येक गल्ली, त्यातल्या चाळी, चाळीतल्या धंदेवाल्या अन् कोठ्या ओळखीच्या आहेत. सारा धंदा मी डोळ्यांनी पाहिलाय. इथं राहिलोय, इथं ड्राइव्हर म्हणून काम केलंय. ड्राइव्हर म्हणून गिऱ्हाईकांना आणण्याचं आणि नंतर सोडण्याचं काम केलंय. पोटासाठी संपूर्ण आयुष्य इथं काढणारा, पुरुषांना मोकळं करणारा, त्यावर जगणारा आणि इतरांना जगवणारा हा बाजार. शरीरविक्रयाचा म्हणजे परपुरुषाबरोबर झोपण्याचा धंदा जिथं होतो, ते पाहवत नाही आता. फार किळसवाणं दृश्य असतं. ‘हमाम में सभी नंगे होते है,’ म्हणतात ना, तसं या कोठ्यात असतं. काही ठिकाणी पडदे असतात, काही वेळा ते नसतात आणि दोन-तीन बाया अन् त्यांची गिऱ्हाईकं शेजारी-शेजारी असतात. कधी कोणाचं लहानसं मूल तिथे झोपलेलं, खेळत व रडत असतं. त्यात गिऱ्हाईकांचे नाद तर काय सांगावेत? बाईला उलटसुलट, खाली, वर फिरवत असतात. एकाच वेळी कॉटवर आणि कॉटखाली असेही व्यवहार सुरू असतात. बरेच जण पिऊन आलेले, कोणाच्या तोंडात सिगारेट, तंबाखू. बायांच्या शरीरालाही तो वास येऊ लागतो. गिऱ्हाईक गेलं की मोरीत तेवढा भाग धुवून घेतला की पुन्हा रस्त्यावर येऊन नवा पुरुष शोधायचा. त्यातून होणारे छोटे व मोठे, आयुष्यभराचे आणि मरणापर्यंत नेणारे आजार हा वेगळा विषय. उपाशी मरायचं की या आजाराने मरायचं असे दोनच पर्याय समोर असतात. त्यातला एक निवडायचा असतो…” नामदेव बोलून गेला.
“पण च्यायला, इथल्या पोरी हल्लीसारख्या बदलतात रे. आलेल्या तरुण पोरी इथं फार टिकतच नाहीत. रात्र झाली की त्या इथून बाहेर पडतात. रात्रभर बाहेर असतात. त्या इथं धंदा नाही करत. पूर्वीपेक्षा त्या सुंदर असतात. त्यांचे कपडे, स्टाईल, बोलण्याची पद्धत पाहिली, तर त्या इथल्या पोरी वाटणारच नाहीत,” असं नामदेव म्हणाला. या पोरी रात्र झाली की कुठं जात असाव्यात? कुठं धंदा करत असतील? असा विचार डोक्यात सुरू झाला. पोहोचलो ‘बच्चूसेठच्या वाडी’मध्ये. बच्चूसेठची वाडी किंवा बच्चूभाईची ही वाडी नाच-गाण्यासाठी प्रसिद्ध. इथं शरीरविक्रयापेक्षा म्हणे कलेला अधिक महत्त्व. कलेचे तथाकथित ‘कदरदान’ जिथं येतात हे ते ठिकाण. म्हणे, एके काळी प्रख्यात गायक के. एल. सैगल इथं गाणं ऐकायला येत आणि नाच-गाणी ऐकून पाहून झाल्यावर रात्री उशिरा टांग्यात उभं राहून गाणं म्हणत म्हणत घरी जात. करीम लाला, हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम हे या वाडीतल्या कलेला आणि कला सादर करणाऱ्या बायांचे आश्रयदाते होते. पैसे तर देतच, पण त्यांचं संरक्षणही मिळत असे यांच्याकडून.
नेहमी संध्याकाळनंतर रंगणाऱ्या बच्चूसेठच्या वाडीत रात्र झाली तरी शुकशुकाट होता. एकही कोठ्यातून नाच-गाण्याचा, वाद्यांचा आवाज येत नव्हता. फेरी मारत असताना “आव साब”, असा आवाज दोन ठिकाणहून आला. एक वयस्क होता आणि दुसरा तरुण. ते कोठ्यावर बोलावत होते. त्यांच्या दृष्टीने आम्ही गिऱ्हाईकच होतो. बाहेर येताना एका उघड्या कोठ्याचा आत तबला, हार्मोनियम, घुंगरू व ढोलक निपचित पडलेला दिसला. मोगऱ्याचे काही गजरेही तिथं तयार ठेवले होते. इतक्यात एक तरुण बाई आली, आव साब म्हणत. मागून एक पुरुष. त्याने नामदेवला ओळखलं. त्याला विचारलं, “इस समय इतना क्यू थंडा है? सभी लडकीया कहा गई? कोई दिखती नहीं…” त्यावर उत्तर आलं, ‘साब, यहाँ आज कल कोई आताही नहीं. सभी तय्यारी रहती है, लेकिन नाच और गाना देखने, सुनने यहाँ नहीं, सारे लोग बार में जाते है. वहाँ ना लफडा ना झंझट. तो सारी लडकीया भी बार में नाच और गाने के लिये जाती है. कोई सिर्फ वहाँ सर्विस करती है. शाम को टैक्सी से जाती है और देर रात या सुबह टैक्सीवाला आकर छोड़ता है.” इथला बाजार उठत चालल्याचं हे लक्षण होतं.
बाजाराचं स्वरूप बदलत चालल्याचा हा जणू पुरावाच. इथल्या तरुण व नव्या मुली रात्री दिसत का नाहीत? त्या कुठं जातात? हा प्रश्न फोरास रोडवर फिरताना पडला होता. त्याची उत्तरं मिळायला सुरुवात झाली होती. आता नाच-गाणं बारमध्येच सुरू झाल्यावर अशा जुन्या-पुराण्या व बदनाम वाडीमध्ये नव्या पिढीतील तरुण तरी कशाला येतील? मस्त एसीचं थंड वातावरण, गादीऐवजी मस्त खुर्च्या, समोर टेबल, त्यावर ग्लास भरून द्यायला उभ्या मुली, अगदी खेटून उभ्या, त्यांचं शरीर आपल्याला लागतंय, त्यातून भावना उत्तेजित होत आहेत. समोरही सुंदर मुली गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी, त्या तरुण पोरींच्या घायाळ करणाऱ्या अदा, आपल्याला हवं ते खायला आणून देणारे वेटर, येता-जाता सलाम ठोकणारा वॉचमन, सेठही प्रेमानं बघणारा, पैशांची उधळण करण्यासाठी प्रसंगी उधारीवर हजारो रुपये देणारा मालक, चार वेळा येऊन चौकशी करणारा बारचा मॅनेजर, नोटा पाहून अंगापाला चिकटणाऱ्या मुली… यात आजाराचा धोकाही नाही. आत शिरताना, बाहेर पडताना घाबरत इथं तिथं पाहण्याची गरज नाही… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौदा ठरलाच तर चांगल्या हॉटेलात नेता येणं. कामाठीपुऱ्यातल्या त्या अस्वच्छ व नंग्यापुंग्या, किळसवाण्या वातावरणापासून खूप दूर. हे समाधान केवळ गिऱ्हाईकांनाचं नव्हे, तर त्या मुलींनाही. कोठीत चार-चौघासमोर होणारा अपमान इथं टळतो. गिऱ्हाईक म्हणजे सर थोडा प्रेमाने, आदराने वागतो. कोठीवरचा सेठ हा जुनाट शब्द येतही नाही. शिवाय हॉटेलातलं चांगलं पिणं-खाणं, स्वच्छ चादरी आणि मिळणारे जास्त पैसे. त्यामुळे रात्रभर शक्यतो बाहेर घालवून दिवसा मूळ ठिकाणी यायचं. मोबाइल नंबरची देवाणघेवाण झाल्यामुळे गिऱ्हाईक बारमध्ये खर्च न करता, आपल्याला जादा रक्कम देण्याची शक्यता. गिऱ्हाईकाला आपण भुरळ पडली किंवा तो प्रेमात पडलाच तर दरमहा ‘खर्च’ मिळण्याची शक्यता. मग आणखी कोणाबरोबर शय्यासोबत करायची गरज नाही.आपल्याला व गावच्या घरच्यांना चांगलं आयुष्य जगायला मिळण्याची शक्यता.
कामाठीपुऱ्यातील रेड लाईट एरियाचा बाजार उठण्याचं हेही एक कारण. बच्चूसेठच्या वाडीत जायच्या दहा वर्षं म्हणजे १९९५ साली रात्री ग्रॅण्ट रोडच्या काँग्रेस हाऊस परिसरात पाच-सहा जण चाललो होतो. डॉक्टर नाईक आडनाव सांगणाऱ्या व काठी घेऊन चालणाऱ्या एका व्यक्तीने विशिष्ट इमारतीतील कोठ्यावर नेलं. अनोळखी माणसाने चुकू नये, म्हणून त्या इमारतीच्या खाली “मुंबई संगीत कलाकार मंडल” असा मोठा बोर्ड. एका कोठ्यापाशी येताच, “आव साब,” म्हणून एकीनं स्वागत केलं. बसण्यासाठी तीन बाजूला गाद्या टाकलेल्या, मध्यभागी ‘तवायफ’ म्हणजे नाचणाऱ्या गाणाऱ्या बाईसाठी जागा, तिच्यामागे वादक, गायक आणि पानाची चंची बाजूला ठेवून बसलेली कोठ्याची मालकीण. चित्रपटात असतं तसं दृश्य. पण तो कोठा म्हणजे खोली खूपच लहान. त्या मध्यमवयीन तवायफने पायाला घुंगरू बांधले आणि साडी थोडी वर खोचून गाणं व नाच सु्रू केला. ‘सलामे इश्क मेरी जान, जरा कुबुल कर लो’. आवाज फारच वाईट आणि नाच म्हणजे नुसत्या उड्या, थोडे हातवारे, गिरक्या आणि लक्ष मात्र समोर बसलेल्या गिऱ्हाईकांच्या हातातील गड्डीकडे. लोक एक एक करून नोटा तिच्या हातात खुपसत होते. त्या नोटा पाहून ती आणखी हुरूप आल्यासारखे भासवत होती. ते गाणं संपलं. नाच व गाणं करणारी ती एकटीच होती. तिच्याकडे मुजऱ्याच्या तीन-चार जुन्या, लोकप्रिय गाण्यांची फर्माईश झाली. पण त्यातलं तिला एकही माहीत नव्हतं. ती बरीच जाड आणि साडीत खूपच लठ्ठ दिसतं होती. तिला नाच येतो, असं म्हणणंही चुकीचं होतं. सारेच कंटाळले. निघाले, तेव्हा ती म्हणाली, “साब दो दिन से फुलू और खांसी, जुकाम है. अगली बार आओगे तो बहुत अच्छे गाने और मुजरा देखोगे. लेकिन आना जरूर.” बाहेर पडलो, तेव्हा बाजूच्या सर्वच कोठ्या बंद होत्या. एका कोठ्यावरून फक्त घुंगरू व गाण्याचा आवाज येत होता. बाकी एके काळी बड्या, श्रीमंत शौकीन लोकांचा नियमित वावर असायचा, तिथं असा शुकशुकाटच होता.
सुमारे तीस वर्षांपूर्वी कामाठीपुरा, बच्चूसेठची वाडी, काँग्रेस हाऊस परिसर, केनेडी ब्रिज, गिरगावची नवलकर लेन, कांदेवाडी परिसरात सुमारे ५० ते ६० हजार मुली व बाया नाच-गाण्याच्या माध्यमातून वा थेट रस्त्यावर उभं राहून आणि गिऱ्हाइकांना हाका मारून आपलं शरीर विकायचा धंदा करायच्या. रोज रात्री या भागात रौनक असायची. संध्याकाळपासून शरीराची रंगरंगोटी आणि ‘शुक शुक’ म्हणून बोलावणं, त्यांच्याकडे पाहून अश्लील हातवारे करणं सु्रू व्हायचं. दलाल, भडवे आणि तिथल्या पोरांमार्फत भाजीपाव, ऑम्लेट पाव, भजी, कबाब, चाय, नवरतन एकसोबीस पानं असं मागवायला सुरुवात व्हायची. सामान्य लोकांना व बायकांना त्या एरियातून यायला जायलाही भीती वाटायची. एक भीती समोर अंगावर येणाऱ्या बाया आणि भडव्यांची आणि दुसरी भीती या रस्त्यावर ओळखीचं कोणी पाहिलं तर इज्जत पार खल्लास व्हायची. रस्त्यावर उभं राहून धंदा करणाऱ्या बायांची गर्दी झाल्याने रेटही मिळेना. गिऱ्हाइकांकडून भाव पाडले जाऊ लागले. ते परवडेना आणि दिवसाचा खर्चही निघेना. त्यामुळे कोठ्याची मालकीणही कटकट करू लागली. परिणामी त्यातल्या काही तरुण पोरी कामाठीपुरा आणि एकूणच रेड लाईट एरियाच्या बाहेर येऊ लागल्या. शरीराचा धंदा करताना काळजी घ्यायची सवय तर स्वयंसेवी संस्था, जवळचे डॉक्टर यांच्यामुळे आधीच लागली होती. ‘नो कन्डोम, नो सेक्स’ हे दोन्हीकडून पाळलं जात होतं.
रात्र होऊ लागली की बऱ्याच पोरी व बाया बोरीबंदर, फोर्ट, कुलाबा, चर्चगेट, गिरगाव चौपाटी, मरिन ड्राइव्ह व नरिमन पॉईंट भागात येऊन गिऱ्हाईक शोधू लागल्या. तृतीयपंथीही अशा ठिकाणी व रस्त्यांवर गिऱ्हाइकांचा शोध घेऊ लागले. तिथं पोरी आणि तृतीयपंथीयांना गिऱ्हाईक मिळूही लागलं. जवळच्या एखाद दोन तासवाल्या चद्दरबदलू हॉटेलात जाऊन काम पूर्ण करणं इथंही सोपं झालं. अधूनमधून पोलीस उचलणार आणि रात्रभर कोठडीत ठेवणार. दुसऱ्या दिवशी ताकीद देऊन सुटका झाली की पुढील दोन रात्री उभं राहण्याची जागा बदलायची. बोरीबंदर भागातील बस स्टॉपवर उभं राहिलं की, ‘ओन्ली 500 बक्स’ (रुपये) म्हणत तंग कपड्यातली एखादी पोरगी हमखास समोरून जाणार. रात्री असंच चित्र मरिन ड्राइव्ह व अन्य भागातही. पण यात रिस्क अधिक आणि पैसा कमी. त्यापेक्षा लेडीज सर्व्हिस बार अधिक सोयीचे. तिथं तुम्हाला नाचता, गाता येण्याची गरज नाही. लेडीज सर्व्हिस बारच्या अंधारात. कोणाचा चेहरा कोणाला दिसत नाही. अंगाला कितीही चिकटलं वा उभ्या उभ्या शक्य होणारे प्रकार केले, गिऱ्हाईकांना मोकळं केलं तरी त्यासाठी टीपखेरीज आणखी दोनशे रुपये मिळतात. पाच सहा-तासात अशी पाच गिऱ्हाईकं मिळाली तरी सव्वा ते दीड हजार मिळतात. त्यात गिऱ्हाईक पटलं, बाहेर घेऊन गेलं की रात्रीच्या चांगल्या पिण्या-खाण्याची सोय आणि वरून आणखी पैसे मिळतात.
अशा प्रकारांमुळे बऱ्या व चांगल्या दिसणाऱ्या, थोडं फार गाता वा शरीर हलवता येणाऱ्या मुली रेड लाईट एरियातून हळूहळू कायमस्वरूपी बाहेर येऊ लागल्या. अँटॉप हिल, प्रतीक्षा नगर, भांडूप, ठाणे, त्यापुढे अगदी बदलापूर, नवी मुंबई व पनवेल आणि पश्चिम उपनगरात सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड आणि पुढे मीरा रोड, भायंदर, नायगाव आणि वसई व विरारपर्यंत त्या राहायला गेल्या. काहींनी स्वतः भाड्याने घरं घेतली, काहींचे तात्पुरते नवरे त्यांच्या घरांची भाडी भरू लागले. बाईला ठेवलं म्हणतात, असा प्रकार. इथं गेल्यामुळे त्यांची रेड लाईट एरियातील पोरी ही ओळख पुसली गेली. त्यातील काहींनी मग आई, भाऊ, वहिनी अशा काहींना गावाहून इथं मुंबईत आणलं. आपण कुटुंबवत्सल आहोत, असं शेजाऱ्या-पाजाऱ्यांना भासवण्यासाठी आणि स्वतःच्या रक्षणासाठीही.
याचा आणखी एक फायदा झाला. डान्स बार, ऑर्केस्ट्रा बार व फक्त लेडीज सर्व्हिस बार सर्वत्र पसरले असल्यानं त्यांना येणं-जाणं सोपं झालं, खर्च कमी झाला. रस्त्यावर गिऱ्हाईक शोधण्याचा त्रास संपला. बारमध्ये येणारे लोक स्वतःहून पोरींना ‘येणार का?’ असं विचारू लागले. त्यामुळे जादा भाव मिळू लागला. शिवाय गिऱ्हाईक चांगलं, मालदार असेल तरच जायचं, नाही तर नाकारायचं हा अधिकार मिळाला. त्या बदल्यात बारमालक, मॅनेजर व वेटर यांना थोडे पैसे द्यावे लागले तरी ते परवडतं. त्यातून ‘फोरास रोडची धंदेवाली’ म्हणून होणारी बदनामी थांबली. शिवाय अधिक पैसा मिळू लागल्याने उत्तम कपडे, नीट राहणं, चांगला मेकअप, चांगलं खाणं व पिणं हे शक्य झालं.
सध्या कामाठीपुरा भागात धंदेवाल्या बाया व पोरींची संख्या 45 हजारावर होती, ती जेमतेम ४०० वर आली आहे. इतक्या कमी बाया असल्यानं फारशी गिऱ्हाईकं या रस्त्याकडे वळतच नाहीत. बऱ्याच बाया मध्यमवयीन असल्यानं त्यांना आता अन्यत्र गेलं तरी धंदा जमणार नाही. धंद्याचं स्वरूपच बदलून गेलं आहे. आता धंद्याचे व्यवहार बारमध्ये वा तिथं दिल्या घेतल्या जाणाऱ्या मोबाइल नंबरद्वारे होतात. नव्या पिढीतल्या पोरींनी ती पद्धत आत्मसात केली आहे. वय व शरीराचा आकर्षक बांधा व भाग हरवून बसलेल्या बायांना तो जमलं नाही आणि जमणारही नाही. त्यामुळे कामाठीपुऱ्याचा शरीर विकण्याचा बाजार पार उठला आहे. जुन्या चाळी पडून उंच इमारती येत आहेत, शरीरविक्रयाच्या धंद्याशी सारे संबंधित इथून फेकले गेले वा जात आहे. बच्चूसेठच्या वाडीच्या जागेतही टॉवर आले आहेत, काँग्रेस हाऊस परिसरातील कोठे असलेली इमारत मोडकळीस आली आहे आणि राहणाऱ्या बायाही मोडून पडल्या आहेत. कांदेवाडी, केनेडी ब्रिज, नवलकर लेन अशा ठिकाणी आता त्या पोरी व बाया अपवादानेच दिसतात. डान्स बारवर बंदी आली आणि काही महिने अडचणीचे गेले, पण सर्वांनीच त्यातून मार्ग काढले. आता तर उत्तर भारतातील गावांमध्ये बारमध्ये होतात तसा डान्स अन् तशाच पोरी करतात. त्याला जणू मान्यताच मिळाली आहे.
काळाच्या ओघात सारं बदलणं स्वाभाविकच म्हणायला हवं. पण पोटापाण्यासाठी काही ना काही करावंच लागतं. त्यासाठीची पद्धत व मार्ग बदलला जातो. मुंबईचा शरीरविक्रीचा सर्वात मोठा बाजार आधी एका ठिकाणीच होता. म्हणजे घाऊक बाजार होता तो. आता हा घाऊक बाजार बंद झालाय. पण मुंबई शहरात ठिकठिकाणी छोट्या-छोट्या मंडया सु्रू झाल्या आहेत. तिथं व्यवहार सुरूच आहेत. शरीराची किरकोळ बाजारपेठ पूर्ण शहरभर पसरली आहे.
(अक्षरदान दिवाळी अंक २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख)
ई-मेल : sanjeevsabade@gmail.com