मुंबई : रावसाहेब दानवे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदावर असणे हे विरोधकांच्या फायद्याचे आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी कशाला करता? ते करत असलेल्या वक्तव्यांचा विरोधी पक्षांनाच जास्त फायदा होईल, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केली. जालना येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दानवे यांनी शेतकर्यांबाबत अपशब्द उच्चारले होते. या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.
यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही सुनावले. शिवसेना राज्यभर दौरे करत आहे. भाजपाही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. मात्र आपण निवांत बसलो आहोत. १५ वर्षं सत्ता उपभोगली. आता सरकार जाऊन अडीच वर्षे झाली. परंतु, आपली मानसिकता सत्ताधार्यांसारखी राहिली आहे. तेव्हा मानसिकता बदला आणि कामाला लागा. रस्त्यावर उतरून संघर्ष करा. लोकांना विरोधकांकडून अपेक्षा आहेत, असे पवार यावेळी म्हणाले.