रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांचे पवार यांनी सांत्वन केलं आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या दुर्घटनेप्रकरणी जास्तीत जास्त आर्थिक मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून कशी मिळेल यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू, तसेच धरणाच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार होऊनही दुर्लक्ष करण्यात आलं याबाबत राज्यसरकारच्या यंत्रणेला उचित अशी चौकशी करायला सांगू आणि योग्य ती कारवाई कारण्याबाबत आग्रह धरू असं पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांना आश्वासित केलं. आमदार भास्कर जाधव, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शेखर निकम, पंचायत समिती सभापती पूजा निकम, चिपळूणचे प्रांत, तहसीलदार आदी उपस्थित होते..
दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केलं. तसेच तिवरे धरण फुटले कसे याची पहाणी करून येथील ग्रामस्थांशी चर्चा देखील केली. त्याचबरोबर राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देखील करण्यात आली. तिवरे येथील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नसल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. तसेच राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार करू आणि ही दुर्घटना किती भीषण होती याची माहिती केंद्र सरकारला देणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.














