
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जगप्रसिद्ध गणपतीपुळेतील श्रींचं दर्शन घेतलं.`अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ते गणपतीपुळेत उपस्थित होते. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी देवस्थान विषयी माहिती घेतली.
सकाळी 9 वाजता पवार गणपतीपुळेत दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत रोहित पवार, पार्थ अजित पवार, शेखर निकम, बाबाजी जाधव, देवस्थानचे सरपंच डॉ. विवेक भिडे, नाना मयेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. लंबोदराचं दर्शन घेतल्यानंतर पवार यांनी गणपतीपुळे देवस्थानच्या कार्यालयात देवस्थान विकासाबाबत चर्चा केली.
यावेळी डॉ. भिडे यांनी देवस्थानच्या विविध उपक्रमांबाबत शरद पवार यांना माहिती दिली. पवार काही वर्षांपूर्वी गणपतीपुळेत आले होते, त्यावेळच्या आठवणींना पवार यांनी यावेळी उजाळा दिला. गणपतीपुळे देवस्थानचा पहिला विकास आराखडा शरद पवार मुख्यमंत्री असताना मंजूर झाला होता. त्यानंतर मंदिराचा कलशारोहण कार्यक्रमही पवारांच्याच उपस्थित झाला होता. त्यावेळेच्या फोटोंचा अल्बमही पवार यांना यावेळी दाखविण्यात आला. पवार यांना यावेळी देवस्थानकडून गणपतीपुळे मंदिराची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यानंतर पवार पुढच्या प्रवासाला रवाना झाले.
















