मुंबई : आधुनिक महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही अशा पद्मविभूषण शरद पवार यांनी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद अशा चारही सभागृहांचे सदस्यपद भूषविलेले आहे. पवार हे सर्व प्रकारच्या खेळपट्ट्यांवरील अष्टपैलू व्यक्तीमत्व आहेत. त्याचबरोबर शेती, कष्टकरी समाज, पाणी अशा ग्रामीण भागातील मूलभूत समस्यांची मुद्देसूद मांडणी करून त्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ध्येयनिष्ठा, तत्वनिष्ठा, साधेपणा जपून जनतेशी बांधिलकी जपणारे देशमुख हे नवीन पिढीला मार्गदर्शक ठरणारे भीष्म पितामह आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांच्याही कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी पवार आणि देशमुख यांच्या गौरवशाली कारकिर्दीचा आढावा घेतला.
शरद पवार यांच्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, पवार यांनी आयुष्यभर सामाजिक प्रगती आणि न्यायाचा वसा घेतला आणि आपल्या भूमिकेवर ते कायम आग्रही राहिले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची दोन टप्प्यात विभागणी करता येईल. यामध्ये १९६७ ते १९९१ ही पहिली पंचवीस वर्षे ते राज्याच्या तर पुढील पंचवीस वर्षे देशाच्या राजकारणात अधिक सक्रीय राहिले. या काळात ते १४ वेळा निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकले. चारवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या पवार यांनी केंद्रातही महत्त्वाची मंत्रीपदे भूषविली. संरक्षण मंत्री म्हणून काम करताना सियाचीनला भेट देणारे ते पहिले संरक्षण मंत्री ठरले. सीमावर्ती भागासही त्यांनी भेट दिली. तांदूळ निर्यात करणारा देश ही ओळख भारताने त्यांच्या कृषीमंत्री पदाच्या काळातच मिळविली. कापूस, साखर निर्यातीतही भारत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या कारकिर्दीचे संयुक्त राष्ट्रसंघानेही विशेष कौतुक केले. शेती क्षेत्रात रस घेऊन त्यांनी सातत्याने विशेष प्रयोग केले. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री याचबरोबर देश आणि राज्यात विरोधी पक्षनेते म्हणूनही काम करणारे ते दुर्मिळ व्यक्तीमत्व आहे.
पवार यांचे क्रीडा, साहित्य, संगीत आदी क्षेत्रांवरही विशेष प्रेम आहे. विविध क्रीडा संघटनांशी त्यांचा घनिष्ट संबंध असून खेळांना राजाश्रय तसेच भक्कम आर्थिक पाठबळ देऊन राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. प्रवासाची प्रचंड आवड असणाऱ्या पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला असून जे जे उत्तम आहे ते समजून घेण्याकडे त्यांचा नेहमीच कल राहिला आहे. हे करीत असताना नवीन पिढीची गरजही ते जाणून घेण्याचा आवर्जून प्रयत्न करतात, असे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आपल्या कारकिर्दीत विविध क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषविलेल्या शरद पवार यांचा वैयक्तिक संपर्क दांडगा असल्याने त्यांनी सर्वच क्षेत्रातील लोक जोडले आहेत. याचबरोबर संस्थांची निर्मिती आणि त्यांचे मजबुतीकरण करून, केलेले काम पुढे अखंड सुरू राहील याची दक्षताही त्यांनी घेतली. रोजगार हमी योजना व फलोत्पादन क्षेत्रात श्री.पवार यांचे विशेष योगदान राहिले असून रोजगार हमी योजना नंतर देश पातळीवर राबविली गेल्याचा फडणवीस यांनी उल्लेख केला. राज्याच्या विकासात खासगी क्षेत्राला सहभागी करून घेणे, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करणे, आदिवासींसाठी अर्थसंकल्पात निधी राखीव ठेवणे, स्त्री विवंचनेतून मुक्त व्हावी यासाठी तिला समान हक्क मिळवून देणे, पाणी हा शेतीचा महत्त्वाचा भाग असल्याने ठिबक सिंचनाचा आग्रह धरणे, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्याला मुंबईस जोडण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे अशा विविध क्षेत्रांमध्येही श्री. पवार यांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. त्यांच्या काही विशेष भाषणांमधील उतारेही फडणवीस यांनी यावेळी वाचून दाखविले.
विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्याविषयी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, आंदोलने, चळवळ, कारावास या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरूवात करणारे आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचा दहा वेळा निवडून येण्याचा विक्रम मोडीत काढणारे देशमुख हे महाराष्ट्र विधानसभेतील भीष्म पितामह आहेत. दुष्काळी भागाच्या आणि कष्टकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने झटणारे देशमुख हे चार राजकीय पिढ्यांशी जोडलेले असून विषयाची मुद्देसुद मांडणीची त्यांची हातोटी नवीन सदस्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. टेंभू, म्हैसाळ प्रकल्पाच्या माध्यमातून सांगोला सारख्या दुष्काळी भागास पाणी मिळविण्याच्या प्रयत्नांबरोबरच ग्रामीण भागातील विविध प्रश्नांची सोडवणूक करताना राज्याला दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. दुष्काळी भागातील सूत गिरणी यशस्वीपणे चालविण्याबरोबरच त्यांनी फळबाग योजनांच्या माध्यमातून हा भाग समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आता डाळींब तसेच ॲपल बेर निर्यात करण्यापर्यंत या भागाने मजल मारली आहे. या परिसरात झालेल्या विकासकामांमुळे त्यापूर्वी ‘माण’देशातून होणारे स्थलांतर थांबल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
आपल्या ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत चार वर्षे मंत्रीपदी तर ५१ वर्षे विरोधी पक्षात राहिलेल्या देशमुख यांनी विधीमंडळातील विविध समित्यांमध्ये काम पाहिले आहे. मंत्री असताना देखील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी तळमळीने केले. राज्यपालांमार्फत सर्वाधिक तीन वेळा हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेले ते एकमेव सदस्य असल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
आपल्या कारकिर्दीच्या माध्यमातून राज्याला दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे तसेच राज्याला त्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यापुढेही प्राप्त व्हावे, अशा शब्दात शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री यांनी मांडलेल्या या अभिनंदनाच्या ठरावावर विधानसभेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य जयंत पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य आशिष शेलार,दिलीप वळसे पाटील तसेच विधानपरिषदेत सदस्य सुनील तटकरे, माणिकराव ठाकरे, नारायण राणे, डॉ. नीलम गोऱ्हे, कपिल पाटील आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.