मुंबई: माजी उप महापौर आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका शैलजा गिरकर (५८) यांचे रविवारी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान अल्पशा आजाराने दुुःखद निधन झाले. शनिवारी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्या कांदिवलीतील ऑस्कर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. मधुपुरी अपार्टमेंट येेथे सकाळी १० ते १२ अंतिम दर्शन व दुपारी १२ वाजता कांदिवलीतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पती विद्यमान आमदार विजय (भाई) गिरकर व दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. अभ्यासू नगरसेविका म्हणून त्यांची ओळख होती.
कांदिवली पश्चिम मतदार संघातील प्रभाग क्रमांक २१ मधून त्या निवडून आल्या होत्या. गिरकर १९९७ पासून ते आतापर्यंत नगरसेवक म्हणून ५ वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. शिक्षण समिती अध्यक्ष आणि महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष पदाची त्यांनी धुरा सक्षमपणे सांभाळली होती. स्थायी समितीच्या विद्यमान सदस्याही होत्या. प्रभागात त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.