नवनाथ मोरे, (लेखक हे इतिहासाचे आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अभ्यासक आहेत)
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपले प्राणपणाला लावले. अनेकांच्या छोट्या मोठ्या लढाया यावेळी महत्त्वाच्या होत्या. इतिहासाने त्याची दखल घेतली असली तरी अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली गेली नाही. ते समाजापर्यंत पोहोचलेच नाही. आदिवासी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची दखल इतिहासाला घ्यावी लागली. परंतु अजूनही ते जनसमाजात पोहोचलेले नाहीत.
राघोजी भांगरेंचा जन्म ८ नोव्हेंबर १८०५ रोजी देवगाव येथे आदिवासी महादेव कोळी जमातीतील आई रमाबाई व वडील रामजी यांच्या पोटी जन्म झाला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने नटलेले देवगाव हे छोटेसे खेडे होते. वडील रामजी ब्रिटिश सरकारच्या दरबारी सुभेदार म्हणून नोकरी करत होते. परंतु इ. स. १८१८ साली ब्रिटिशांनी मराठा सैन्यास हरवल्यानंतर महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्यांच्या शिलेदाऱ्या, वतनदाऱ्या काढल्या. परंपरागत अधिकार काढल्याने इंग्रजांविरुद्ध महादेव कोळ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.
कोकणात एक दरोडा पडला होता, या दरोड्याचा आरोप राघोजीचे वडील बंडखोर असल्यामुळे त्यांच्यावर करण्यात आला. राघोजींच्या घरच्यांचा पोलिसांनी मोठा छळ केला. राजूर प्रांताचा पोलिस अधिकारी अमृतराव कुलकर्णी यांची भेट घेऊन छळ थांबविण्यासंदर्भात दोघांमध्ये बोलणे चालू असताना बाचाबाचीत अनर्थ झाला. धिप्पाड राघोजीने मुंडकं तोडून एका कोपऱ्यात ठेवले. धिप्पाड राघोजीला अडविण्यास कोणी धाजवले नाही. १८२६ चे ते साल त्यांनी आपल्या सुखी जीवनावर तुळशीपत्र ठेवले. राघोजी भांगरे आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाने क्रांतीची मशाल अधिक तेजस्वी होऊ लागली. १८२७ साली हिवाळ्या घाटाच्या दरीमध्ये प्रचंड काळोखात एक सभा घेतली. येथील सभेत देवजी आव्हाड सहाय्यक सल्लागार, तर राया ठाकर राघोजींचा अंगरक्षक बनला. मायभूमीला मुक्त करण्याची शपथ यावेळी घेतली गेली. राघोजींच्या टोळ्यांनी गोऱ्यांना सळो की पळो करून सोडले.
इ. स. १८२८ ला शेतसारा वाढविण्यात आला. सारावसुलीमुळे गोर गरीबांना पैशाची गरज भासू लागली. त्यामुळे गोरगरीब सावकर-वाण्याकडून भरमसाठ कर्ज घेऊ लागले. त्यामुळे कर्जाच्या बदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. राघोजीने सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंड तीव्र केले. इंग्रज सत्तेच्या विरोधात नगर, पुणे, नाशिक, ठाणे या भागात बंडकऱ्यांच्या टोळ्या उभ्या केल्या.
इ. स. १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरूंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटले होते. परंतु ते प्रत्यक्षात आले नाही. इंग्रजांंविरोधातील असंतोष वाढत होता. भिल्ल जमातीच्या टोळ्या उभ्या राहिल्या, राघोजीना त्यांची साथ मिळाली. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजार रूपये बक्षीस जाहीर केले. इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्यांने बंड उभारले. कॅप्टन मँकिंटॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घखट, रस्ते, जंगले यांची बारीकसारीक माहिती मिळविली परंतु बंडखोर वरमले नाहीत. बंड तीव्र झाले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली, मार्ग रोखून धरले. ८० जणांना कैद केले. दहशतीमुळे लोक उलटले. फितुरीमुळे राघोजीचा खंबीर साथीदार बापूजी भांगरे मारला गेला.
साताऱ्याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते, त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारणे, समाजावर पकड ठेवणे व छळ करणाऱ्या सावकारांना धडा शिकवणे या हेतूने राघोजी खंडणी वसूल करीत असे. १८४४ साली साताराचे राजे प्रतापसिंह छत्रपति यांची भेट झाल्याची अभ्यासकांचे मत आहे.
नोव्हेंबर इ. स. १८४४ ते मार्च इ. स. १८४६ या काळात राघोजींचे बंड शिगेला पोहोचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने ‘आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रजांचे वैरी आहोत’, अशी भूमिका जाहीर केली होती. कुटुंबातील समाजातील स्रियांबद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य, प्रामाणिकपणा व नितिमत्ता याला त्याने उच्चतम मानले. इ.स. १८४५ ला जुन्नरचा उठाव ठरला. कॅप्टन मँकिंटॉशने २० हजाराची फौज घेऊन वेढा टाकला. यावेळी मोठी हार पत्कारावी लागली. भागोजी नाईक, खंडू साबळे आदी निष्ठावंत साथीदार धारातीर्थी पडले. राघोजी तुरी देऊन निसटला. राघोजीला कोणाला शोधता येऊ नये म्हणून गोसाव्याच्या वेशात फिरू लागला. पंढरपूर येथे बंडाच्या काळात तेथील आदिवासींना पुन्हा जमा करून बंड करण्याच्या तयारीत असणाऱ्या राघोजीला इंग्रजांनी पकडले व ठाण्यास नेले. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना वकील मिळू दिला नाही. त्याने कोर्टात स्वतः च बाजू मांडली. २ मे १८४८ रोजी ठाणे सेंंट्रल जेल येथे राघोजी भांगरेंना फाशी देण्यात आली. परंतु राघोजींचे स्मरण करण्यासाठी २ मे २०१४ उजाडावे लागले. यादिवशी १६६ व्या स्मृतीदिनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे सेंट्रल जेल व जिल्हाधिकारी कार्यालाजवळील मुख्य चौकास आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे असे नावे देण्यात आले.