
नवनाथ मोरे, ( लेखक विद्यार्थी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत)
स्वातंत्र्य होऊन सत्तरी ओलांडली असली तरी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, एकता यांचा विचार समाजमनात रूजविण्यास आपण कुठे तरी कमी पडलो. हे शहिद भगतसिंगांना अभिवादन करताना मनात दाटून आल्याशिवाय राहणार नाही. २८ सप्टेंबर १९०७ रोजी लायलपूर जिल्ह्यातील बंगा या गावी विद्यावती आणि सरदारसिंग यांच्या पोटी भगतसिंगांचा जन्म झाला. क्रांतिकारी विचारांचा वारसा लाभलेले कुटुंब आणि चुलते अजितसिंग यांचा स्वातंत्रता चळवळीतील सहभाग. लहान वयातच भगतसिंगांच्या कानावर क्रांतीच्या गोष्टी पडत होत्या. भगतसिंग ८ वर्षाचे असताना ‘गदर पार्टी’ चा १८ वर्षाचा नेता कर्तारसिंग सराभा यांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांंवर कर्तारसिंग यांच्या बलिदानाचा प्रभाव पडला, ते त्यांन आदर्श मानू लागले. त्याचा फोटो नेहमी खिशात असे.
भगतसिंगांच्या आयुष्याला कलाटणी एक देणारी घटना घडली. तेव्हा भगतसिंग १२ वर्षाचे होते. जनरल डायर या क्रूर इंग्रज अधिकाऱ्याने जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या नि:शस्त्र जमावावर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात ३७९ लोक ठार झाले, तर १२०० अधिक लोक जखमी झाले. या घटनेने भगतसिंग अस्वस्थ झाले, त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध चिड निर्माण झाली. भगतसिंग या ठिकाणी गेले. माणसाने माणसावर केलेल्या क्रुर अन्यायाचा अंत करण्याचा निश्चय भगतसिंगांनी येथे केला.
असहकार आंदोलनात भगतसिंगांनी हिरीरीने भाग घेतला. परंतु चौरीचौरा येथील घटनेने महात्मा गांधीजींंनी असहकार आंदोलन मागे घेतले. याचा गंभीर परिणाम भगतसिंगांवर झाला. महात्मा गांधीजींचा दयाळू मार्ग त्यांना पटला नव्हता. त्यांना कार्ल मार्क्सचा साम्यवादी मार्गच शोषणविरहित क्रांती आणू शकेल याची खात्री झाली होती. त्यानुसार त्यांनी कामाला सुरूवात केली. भगतसिंगांनी असहकार आंदोलन संपल्यानंतर पुन्हा शिक्षण चालू केले. त्यांच्यावर मार्क्स, लेनिन, टॉलस्टॉय, दोस्तोवस्की, गॉर्की यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता. मार्क्सच्या विचारधारेप्रमाणे त्यांनी नौजवान भारत सभेची स्थापना केली. त्या माध्यमातून जनतेचे प्रबोधनाचे काम सुरू केले. परंतु मुलाने आता लग्न करून सुखाने संसार करावा, असे त्यांच्या आईवडिलांना वाटू लागले. त्यावेळी मात्र यापासून दूर जाण्यासाठी भगतसिंगांनी घर सोडले. भगतसिंगांनी किर्ती मासिकातून तसेच अर्जुन, प्रताप या पेपरसाठी काम केले. आपले क्रांतिकारी विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम अविरत सुरूच होते.
ब्रिटीश सरकारने २ नोव्हेंबर १९२७ ला सायमन कमिशन नेमले, त्यामध्ये एकही भारतीय सभासद नव्हता. ब्रिटिश सरकारच्या या षडयंत्राविरोधात हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. काळे झेंडे दाखविण्यात आले. ‘सायमन गो बॅक’ च्या घोषणांनी भारतीय आसमंत दणाणून गेले होते. लाहोरमध्ये मोठे आंदोलन उभे राहिले. पोलिसांनी आंदोलकांवर निर्दयी लाठीहल्ला केला, या लाठीहल्ल्यात लालाजींचे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी निधन झाले. लालाजींच्या खूनाचा बदला घेण्याचे ठरले आणि साँडर्सची हत्या करण्यात आली. त्यानंतर भगतसिंगांनी म्हटले आहे, ‘मनुष्याचे रक्त सांंडल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो, पण क्रांतीच्या वाटेवर रक्त सांडणे अनिवार्य होत आहे. आमचे ध्येय क्रांतीचे आहे. जी क्रांती मनुष्याचे मनुष्याकडून चाललेले शोषण थांबवेल.’
भगतसिंगांना शिव वर्मा, बटुकेश्वर दत्त, जयदेव कपूर, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव, महावीरसिंग, यतींद्रनाथ दास, भगवती चरण वोहरा आदींची साथ लाभली. काकोरी कटानंतर क्रांतिकारकांची धरपकड झाली. ८ व ९ सप्टेंबर १९२८ रोजी दिल्लीतील फिरोजशहा कोटलाच्या परिसरातील पडक्या किल्ल्यात क्रांतिकारक जमले. यावेळी नौजवान भारत सभेच्या नावात ‘सोशालिस्ट’ शब्द समाविष्ट करण्याचा ठराव समंत झाला. ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन” असे नाव झाले. भगतसिंग तेथे उपस्थितांंना संबोधित करताना म्हणाले, “कॉम्रेडस् आपले ध्येय फक्त भारतातून इंग्रज सत्ता घालवून देण्यापुरते मर्यादित नाही, तर माणसांकडून माणसाचे होणारे शोषण थांबविणे आणि प्रचलित साम्राज्यवादी व्यवस्था उलथून टाकून समाजवादी समाज निर्माण करणे हे ध्येय असेल.”
त्या निर्दयी व्यवस्थेला जागे करण्याचे काम भगतसिंगांनी केले. जनसुरक्षा आणि औद्योगिक कलह कायदा आणला जाणार होता. हा जनतेची पिळवणूक आणि दडपशाही करणार कायदा असल्यामुळे त्याविरोधात भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी ठरल्याप्रमाणे ८ एप्रिल १९२९ रोजी बाँब टाकले. त्यांनी टाकलेल्या पत्रकात म्हटले होते, ‘बहिऱ्यांना ऐकू जावे यासाठी स्फोटांची आवश्यकता असते…जनतेचा विरोध असताना सदर कायदे करून सरकार दडपशाही अधिक तीव्र करत आहे.” भगतसिंग कधीच हिंसेच्या बाजूचे नव्हते, तसे त्यांनी वेळोवळी स्पष्ट केले आहे. असेंब्लीत कोणालाही इजा होणार नाही, अशा मोकळ्या जागेत बाँब टाकले गेले. भगतसिंगांना पळून जाणे शक्य होते, परंतु जनसामान्यांपर्यंत क्रांतीचा विचार पोहोचविण्यासाठी त्यांनी अटक करून घेतली. खटल्याच्या वेळी ते आपली बाजू ठामपणे मांडत आणि क्रांतीचा विचार वर्तमानपत्रातून पोहोचविण्याचे काम करत. तचरूंगात गेल्यानंतर तेथेही शोषण आणि अन्यायविरोधात लढा लढले. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत हसत फासावर गेले. परंतु ‘इन्कलाब जिंदाबाद’ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला.
जुलै १९२८ च्या ‘किर्ती’ मासिकाच्या संपादकीय लेखात भगतसिंग तरूणांना उद्देशून लिहितात, ‘विद्यार्थ्यांचे मुख्य कर्तव्य शिक्षण घेणं हे आहे. आपलं संपूर्ण लक्ष त्यांनी अभ्यासात गुंतवायला हवं. परंतु देशातल्या परिस्थितीचं ज्ञान आणि त्यात सुधारणा करण्याचे उपखय यावर विचार करण्याची क्षमता निर्माण करणं याचा मात्र या शिक्षणात समावेश नाही असं का? आणि असेच असेल तर अशा शिक्षणाला आम्ही कुचकामी समजतो. फक्त कारकुनी करायलाच शिकायचं असेल तर अशा शिक्षणाची आवश्यकताच का?” याचा विचार करण्याची गरज आहे. आपण एक अरिष्टातून जात आहोत. सामाजिक, शैक्षणिक सर्वच व्यवस्था भांडवलदारांच्या हातात एकवटल्या आहेत. पुन्हा गुलामीकडे तर वाटचाल नाही ना?
भगतसिंग म्हणतात, “आजच्या काळात देशाला तन, मन, धन अर्पण करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी झपाटलेपणानं आपलं सारं आयुष्य झोकून देणाऱ्या देशसेवकांची गरज आहे.” भारत आजही दारिद्र्य, शोषण, अन्याय आणि अत्याचाराने ग्रासलेला आहे. स्वातंत्र्य भारतात रहात असलो, तरी माणसाकडून माणसाचे चाललेले शोषण थांबवू शकलो नाही. या व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्यासाठी तरूणांनी पुढे येण्याचा संकल्प केला पाहिजे. फक्त भगतसिंगाना आदर्श मानून होणार नाही. विधायक कृतीची गरज आहे, ती तुम्ही कराल!














