
प्रातिनिधीक
भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याचा निर्णय
ठाणे : धरणांचा तालुका असलेल्या शहापूर तालुक्यातील काही गावे इतक्या वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून आहेत मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागातील नागरिकांच्या व्यथांची दाखल घेत भावली धरणातील पाणी शहापूरसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याने ९७ गावे आणि २५९ पाड्यांची पाणी समस्या कायमची दूर होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या शहापूर येथील कुणबी महोत्सवात पाण्यासंदर्भातील लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन गुरुत्वाकर्षण पद्धतीने भावली धरणाचे पाणी आणण्यासंदर्भात त्वरित निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते.
पाणी आरक्षित समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे आहे. या समितीकडून पाणी आरक्षणाला मंजुरी मिळाली. या महत्वपूर्ण निर्णयामुळे भावली धरणातून पाणीयोजनेच्या कामाला लवकरच सुरूवात होईल असेही विवेक भीमनवार यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातला प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश दिले होते.
खासदार कपिल पाटील, स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा यांनी देखील यासंदर्भात वारंवार आवाज उठविला होता. विवेक भीमनवार यांनी मुख्य कार्यकारी पदाची सूत्रे हाती घेताच शहापूर भागाचा दौरा करून या भागातील पाणी टंचाईविषयी जाणून घेतले तसेच मंत्रालयात जलसंपदा, पाणी पुरवठा तसेच ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करून तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेतली. आज यासंदर्भात जल संपदा विभागाने पाणी आरक्षणाचा शासन निर्णय प्रसिध्द केला असून त्यानुसार इगतपुरीच्या भावली धरणातून ४.५५ दशलक्ष घनमीटर पाणी दर वर्षी ९७ गावांसाठी आरक्षित करून ठेवले जाणार आहे.
कसे मिळणार गुरुत्वाकर्षणाने पाणी?
इगतपुरी तालुक्यात भावली दारणा नदीच्या उगमस्थानी हे धरण असून दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता आहे. हे धरण ५९० मीटर उंचीवर असून शहापूर भागातील गावे व पाड्या २२० ते ५४० मीटर इतक्या उंचीवर असल्याने भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाने या गावांना पाणी मिळू शकते. यासाठी विजेचा एक युनिटही खर्च करण्याची आवश्यकता नाही असे विवेक भीमनवार यांनी सांगितले. माणशी ७० लिटर दरडोई प्रत्येक दिवशी पाणी पुरविण्याचा यात संकल्प आहे. ही योजना देखभाल व दुरुस्तीच्या दृष्टीने सक्षम होण्यासाठी व्यावसायिक पाणीवाटपाचा उद्देश गृहीत धरण्यात आला असून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आदिवासींना कमी दरात पाणी मिळणार आहे. माळ, दांड सारख्या दुर्गम भागातील गावांबरोबर वाशाळ, खर्डी, कसारा, चेरपोली,शहापूर, आसनगाव अशा २ लाख लोकवस्तीच्या गाव आणि पाड्यांना पिण्याचे पाणी मिळणार आहे. हा प्रकल्प दोन वर्षांत होणे अपेक्षित आहे.