रत्नागिरी, (आरकेजी) : हिंदू-मुस्लिम एेकतेचे प्रतिक असलेल्या चिपळूण तालुक्यातील अलोरे गावातील शहानूर बाबांच्या दर्ग्यावरील उरूस नुकताच साजरा झाला. भाविक मोठ्या प्रमाणावर उरुसासाठी अलोरे येथे दाखल झाले होते. विशेष म्हणजे या दर्ग्यावरील उरूस हिंदूधर्मीय अशोकभाई वडगावकर साजरा करतात.
अलोरे येथील शहानूर बाबांचा दर्गा राज्यात प्रसिद्ध आहे. अशोकभाई दर्ग्याच्या ठिकाणी राहतात. शहानूर बाबांचा उरूस दरवर्षी पाडव्याच्या दुसर्या दिवशी पार पडतो.
४० वर्षांपूर्वी हा दर्गा या ठिकाणी सापडला. याची अख्यायिकाही रंजक आहे. अशोकभाई यांच्या स्वप्नात हा दर्गा नदी किनारी असल्याचे त्यांना दिसले, त्यांनी ही बातमी आलोरे पंचक्रोशीतील नागरिकांना सांगितली. खोदकाम केल्यानंतर शहानूर बाबांचा दर्गा सापडला.
हिंदू नववर्षाच्या दुसर्याच दिवशी या ठिकाणी मोठा उरूस होतो. येथे कोणत्याही प्रकारचा मांसाहार होत नाही. खास अजमेरहून चादर आणि गुलाब येते आणि मग या ठिकाणच्या उरुसाला सुरूवात होते. राज्याच्या बाहेरूनदेखील भावीक येतात. खास करून सांगली, सातारा, कोल्हापुरातून येणार्यांची संख्या सर्वाधिक आहे. येथे आल्यावर मनातील इच्छा-आकांशा पूर्ण होते, अशी समजूत यामागे आहे.