मुंबई : परिक्षांचे निकाल वेळेवर न जाहीर करणार्या मुंबई विद्यापीठाविरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आक्रमक झाली आहे. पदवी परिक्षेचे निकाल त्वरित जाहीर करा, शिक्षणमंत्री व कुलगुरू राजीनामा द्या, अशी मागणी करत आज एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठ फोर्ट येथे तीव्र आंदोलन केले. संघटनेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी मुंबई विद्यापीठ प्रशासन, कुलगुरू व शिक्षण मंत्र्यांविरोधात विद्यापीठाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
३१ जुलैपर्यंत कुठल्याही परिस्थितीत पदवीचे निकाल लावा असा दम राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना देवूनही शेवटी निकाल लागले नाहीत. यास सर्वस्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख जबाबदार आहेत. संघटना मुंबई विद्यापीठ प्रशासन, कुलगुरू व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा तीव्र निषेध करीत आहे. त्यांनी तातडीने राजीनामे द्यावेत, अशी मागणी एसएफआयने केली आहे.
मुंबई विद्यापीठाचे जवळपास २ लाख ९३ हजार उत्तर पत्रिकेचे मुल्यांकन करून त्वरित जाहीर करावेत अशीही मागणी संघटनेने केली आहे. विद्यापीठाच्या वाणिज्य, विधी, कला व अभियांत्रिकी शाखांचे निकाल लागण्यास आणखी काही दिवस लागतील, याचा प्रचंड मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. आतापर्यंत ४७७ पैकी १७१ निकालच विद्यापीठ प्रशासन जाहीर करू शकले आहेत.
४५ दिवसाच्या आत निकाल लागला पाहिजे असा नियम आहे. मात्र विद्यापीठ प्रशासन हा नियम पायदळी तुडवताना दिसत आहे, याकडे एसएफआयने यावेळी लक्ष वेधले.
उत्तरपत्रिकेच्या ऑनलाईन मुल्यांकनाबाबत कुलगुरूंनी केलेला अट्टाहास यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. विद्यापीठाने त्वरित निकाल जाहीर करावे आणि विविध अभ्यासक्रमांचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अडथळा येणार नाही याची जबाबदारी घ्यावी. यातील निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांना जर पुनर्मूल्यांकन करायचे असतील तर विनामूल्य पुनर्मूल्यांकन करावेत अशी मागणी एसएफआय ने केली आहे.
आंदोलनामध्ये एसएफआय राज्य सचिव बालाजी कलेटवाड, मुंबई जिल्हा अध्यक्ष विमलेश राजभर, सचिव रामेश्वर शेरे, उपाध्यक्ष रुपाली जाधव, निकिता पवार, राहुल उबाळे, प्रवीण मांजलकर, राज्य सहसचिव कविता वरे व मोठ्या संख्येने मुंबई विद्यापीठ व अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.