कोल्हापूर : जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि शिक्षणातील मागण्यांसाठी ८ जानेवारी रोजी संपूर्ण देशभर समविचारी संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली. राज्यभरात आणि जिल्ह्यात सर्वत्र शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यात सहभागी झाली. टाऊन हॉलमधून मोर्चाला सुरूवात होऊन बिंदू चौकात समारोप झाला. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते.
सर्वांना मोफत शिक्षणाची मागणीसाठी, उच्च शिक्षणावरील हल्ल्याच्या विरोधात व जेएनयू, जामिया तसेच इतर विद्यापीठात विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी संघटनांनी ‘ऑल इंडिया नॅशनल फोरम टू सेव्ह पब्लिक एज्युकेशन’ असा मंच बनवला आहे. या फोरमने ८ जानेवारीच्या देशव्यापी शैक्षणिक संपाची हाक दिली होती.
दिल्लीतील जेएनयूचे विद्यार्थी वसतिगृहाच्या शुल्कामध्ये होणारी प्रचंड वाढीविरूद्ध एका महिन्याहून अधिक काळ संघर्ष करीत राहिले. पण आता हा प्रश्न फक्त जेएनयूचा नाही तर देशातील सर्व विद्यापीठांचा बनला आहे. जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष मारहाण केली. विद्यार्थ्यांवर आणि शिक्षणावर मोठ्या प्रमाणात दररोज हल्ले होत आहेत. यासाठी देशभरातील अनेक महत्त्वपूर्ण विद्यापीठाच्या विद्यार्थी संघांनी आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन एकजूट उभारली आहे. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी ८ जानेवारी रोजी शैक्षणिक बंद होणार आहे. सर्वांना मोफत शिक्षण मिळावे. उच्च शिक्षणातील समस्या सोडवाव्यात. देशभरात विद्यार्थी निवडणुका लोकशाही मार्गाने घ्याव्यात. नवीन शैक्षणिक धोरणात सुधारणा कराव्या. शिक्षणावरील एकूण खर्चात वाढ करावी. शिष्यवृत्ती व फेलोशिपमध्ये वाढ करावी. विद्यार्थिनीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी जीएस-कॅश समितीची स्थापना करावी. सर्वांसाठी वसतिगृहे उभारण्यात यावे. शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण, केंद्रीकरण व धर्मांधीकरण थांबवा. आदी मागण्या या शैक्षणिक बंदमध्ये करण्यात आल्या.