औरंगाबाद । पृथ्वीची फुफ्फुसं असलेल्या अमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीबाबत देशाची आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाने(एसएफआय) चिंता व्यक्त केली आहे. आज एसएफआय आणि लोकपर्यावरण मंचने पैठण गेट येथे निदर्शने करत या आगीकडे लक्ष वेधले. अमेझाॅन जंगलाला लागलेली आग नियंञणात आणा, पर्यावरण आपत्ती जाहीर करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मागील चार आठवड्यापासून जगाच्या २०% प्राणवायूचा स्रोत असणारं अमेझाॅन वन जळत आहे. मोठा वणवा तेथे पेटला आहे. हजारो प्राणी, वनस्पती नष्ट होत आहेत. जीवसृष्टी वाचवण्यासाठी वणव्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे, याकडे एसएफआयने लक्ष वेधले. जगातील अनेक देश आणि नेते हा मुद्दा महत्वाचा मानत नाहीत याबाबत यावेळी खंत व्यक्त करण्यात आली.
लागलेली आग जागतिक आणीबाणी आहे. मुख्य
प्रवाहातील माध्यमांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. माध्यमांनी पर्यावरणाला कमी न लेखता याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, असे आवाहन एसएफआयने केले.
ब्राझील या देशात हे जंगल येतं. तिथले राष्ट्राध्यक्षही आगीचे लोण रोखले जावे यासाठी ठोस पावले उचलत नाहीत. ही अनास्था उद्या जीवसृष्टीच्या जीवावर उठणार आहे. देशाच्या सीमा पर्यावरणाला लागू होत नसतात, असे एसएफआयकडून सांगण्यात आले.
निदर्शनात एसएफआय चे राज्य सहसचिव नितिन वावळे, जिल्हा सचिव स्टॅलिन आडे, लोकपर्यावरण मंच चे विजय रकटे, रामेश्वर घिटरे यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी झालेल्या निदर्शनास रवी खंदारे, मोनाली अवसरमल, पल्लवी बोराडकर, अभिमान भोसले, रेखा काकडे, भाग्यश्री मरळकर, ओमकार पाटील, प्रमोद घुगे, अंजली हिवाळे, वर्षा सोळंके, माऊली वाघ, सचिन तेगमंपुरे, बाबराय भोसले, भगवान रोटे, रत्नदीप भालेराव, केतन सोनट्टके, परमेश्वर जाधव, श्रीनिवास लांटगे, भगवान शारवणे, फारुक पठाण आदी उपस्थित होते.