मुंबई : मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल ३१ जुलै पर्यंत न लागल्यास १ ऑगस्ट रोजी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली जाईल, आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया विद्यापीठात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
२५ जुलैला एसएफआयने विद्यापीठाच्या पदवीचे निकाल त्वरित लावावेत, अशी मागणी करत कालिना संकुलात निदर्शने केली होती. तसेच कुलुगुरु संजय देशमुख यांची भेटही संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली होती. विद्यापीठाच्या नियमित व दुरस्थ विद्यार्थ्यांचे तृतीय वर्षांचे निकाल त्वरित जाहीर करा, या मागणीचे पत्र कुलगुरू यांना देण्यात आले. यावर विद्यापीठाच्या पदवीचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर होतील असे आश्वासन एसएफआय च्या शिष्टमंडळाला कुलगुरूंनी दिले होते.
दरम्यान, तीन महिने उलटून गेले आहेत. नियमित विद्यार्थ्यांचे निकाल अजून लागले नाहीत तसेच विद्यापीठाच्या दुरस्थ विद्यार्थ्यांचे निकालही लांबणीवर विद्यापीठ प्रशासन टाकत आहे. विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे विद्यापीठाला अनिवार्य आहे. मात्र मुंबई विद्यापीठ हे नियम धाब्यावर बसवत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार विद्यापीठाला नाही. निकालाला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षण धोक्यात आलेले आहे, याकडे एसएफआयने लक्ष वेधले आहे.