मुंबई : सरकाच्या सेवा निश्चित कालावधीत व पारदर्शकपणे मिळाल्या पाहिजेत यासाठी नागरिकांनी सेवा हक्क कायद्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी आज येथे केले.
नरिमन पॉईंटस्थित निर्मल इमारतीत राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन क्षत्रिय यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्षत्रिय म्हणाले, राज्य सरकारने सेवा हक्क कायद्यासारखा क्रांतिकारक कायदा केला आहे. यामुळे नागरिकांना सेवा ही ठराविक कालावधीत प्राप्त करुन घेण्याचा हक्क मिळाला आहे. नागरिकांना मिळणाऱ्या सेवेमध्ये विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर या कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात आहे. सरकारने २५ विभागाच्या ३७९ सेवा ऑनलाईन केल्या आहेत. या सेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. नागरिकांना जी सेवा हवी असेल ती राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात उपलब्ध आहे. या सर्व सेवा ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवरही मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहेत.
राज्यात सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणीसाठी प्रत्येक महसूल विभागात सेवा हक्क आयुक्त यांची लवकरच नेमणूक करण्यात येईल. सेवा हक्क कायद्याबाबत काही अडचणी आल्यास, राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, दुसरा मजला, सिडको,निर्मल इमारत, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१ या पत्त्यावर संपर्क करण्याचे तसेच ईमेल-ccrts@maharashtra.gov.in, ०२२- २२८४६७४१/०२२-६६५००९१८ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहनही क्षत्रिय यांनी यावेळी केले.