रत्नागिरी : नागरिकांना विविध प्रकारचे दाखले देण्यास विलंब होवू नये याची खबरदारी सेतू केंद्रानी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिले. येणाऱ्या काळात इतरही केंद्राना भेटी देण्याचे त्यांनी जाहीर केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सूतू केंद्रास त्यांनी अचानक भेट देवून येथील कामकाजाची तपासणी केली. त्या प्रसंगी ते बोलत होते. या केंद्रातून दाखल्यांना विलंब होण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर ही अचानक भेट होती. सेतू कार्यालय, रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या चर्चा केली त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या आणि सेतू कार्यालयात चालणाऱ्या कामाचाही आढावा घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, रत्नागिरीचे तहसिलदार शशिकांत जाधव, तहसिलदार बिर्जे, सुनील किर तसेच संबधित अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
चव्हाण यांनी उत्पन्न, रहिवासी, अधिवास, राष्ट्रीयत्व सारखे दाखले एक दिवसात नागरिकांना देण्यात यावेत. तसेच दाखले काढण्यासाठी आलेल्या लोकांच्या तक्रारी आल्या नाही पाहिजेत, याची दक्षता घ्या, तसेच सेतू कार्यालयात प्रलंबित प्रकारांचा आढावा दररोज घ्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. मराठा आरक्षणासाठी साठीलागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावा तसेच उत्पन दाखले, अधिवास दाखले, प्रतिज्ञापत्रक सारखे अभिलेख लवकरात लवकर तहसिलदार कार्यालयात तसेच जातीच्या दाखल्या संदर्भातील अभिलेख संबधित विभागात देण्यात यावेत अशाही सूचना त्यांनी यावेळी संबधितांना दिल्या.