मुंबई, १२ मे : भारतीय शेअर बाजार सोमवारी दिवसभर संवेदनशील होते. तरीदेखील बहुतांश काळ तेजीतच सुरु होते. मात्र अखेरच्या क्षणी वित्तीय सेवा क्षेत्रातील बलाढ्य कंपन्यांच्या शेअर्सची जोरदार विक्री झाल्यामुळे शेअर बाजारामध्ये मंदीची नोंद झाल्याचे एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. सेन्सेक्स ८१.४८ किंवा ०.२६ टक्क्यांनी खाली ३१,५६१.२२ अंकांवर थांबला. तर निफ्टी १२.३० अंकांची किंवा ०.१३ टक्के घसरण घेत ९,२३९ अंकांवर पोहोचला. ऑटो सेक्टरमध्ये आज मजबूत तेजी दिसून आली. यामुळे इंट्रा डेमध्ये निफ्टीवर ऑटो इंडेक्स ४ टक्क्यांनी वाढलेला दिसला. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये १०८४ शेअर्सनी वृद्धी नोंदवली. तर १२८० शेअर्सनी नुकसान झेलले. १८६ शेअर्सची किंमत बदलली नाही.
ऑटोमोबाइल क्षेत्रात निफ्टी ५० इंडेक्समध्ये ६ टक्क्यांची वृद्धी नोंदवणारा हिरो मोटोकॉर्प टॉप गेनर ठरला. तो २,०८८२ रुपयांवर बंद झाला. टाटा मोटर्स, बजाज ऑटो आणि मारुती सुझूकीदेखील सकारात्मक स्थितीत पोहोचला. आज नफा कमावणाऱ्या इतर शेअर्समध्ये भारती इन्फ्राटेल, ग्रासीम इंडस्ट्रीज आणि वेदान्ताचा समावेश आहे. बँकिंग क्षेत्रात आजही वाईट स्थिती दिसली. निफ्टी बँक आणि निफ्टी फिन सर्व्हिसेस दोन्हीही १.५ टक्क्यांनी घसरल्या.
कोव्हिड-१९ च्या उद्रेकामुळे वित्तीय संस्थांनी कर्ज न चुकवणाऱ्यांमध्ये वाढ होईल, असा अंदाज वर्तवला आहे. २०२० च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात २६ टक्के म्हणजेच १,२२१.३६ कोटी रुपयांची वाढ झाल्याच्या वृत्तानंतर आयसीआयसीआय बँकेच्स मूल्य ४.६ टक्क्यांनी घसरले. तिचा समावेश टॉप लूझर्समध्ये झाला. बँकिंग क्षेत्रातील इतर लूझर्समध्ये कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडसइंड बँकेचा समावेश आहे.