रत्नागिरी, (आरकेजी) : हा देश हिंदुंचा देश आहे, धर्मनिरपेक्षतेचा येथे उपयोग नाही. त्यामुळे हिंदुत्वाला संरक्षण मिळण्यासाठी रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचेच नाव राष्ट्रपतीपदासाठी योग्य आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लवकरच होणार आहे, या निवडणुकीसाठी शिवसेनेने पुन्हा मोहन भागवत यांच्या नावाचा राग आळवला आहे. सामनातील आग्रलेखानंतर आता शिवसेना सचिव आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भागवत यांचे नाव योग्य असल्याचे म्हटलं आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
राष्ट्रपदीपदासाठी मोहन भागवतांसोबत शिवसेनेची कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. पक्षाने केवळ भागवतांसदर्भात मत जाहीर केले आहे. भाजप या संदर्भात सहानभुतीपूर्वक विचार करेल असा दावा राऊत यांनी केला आहे. राष्ट्रपतीपदासंदर्भात भाजपाने वेगळा उमेदवार दिल्यास शिवसेनेची भूमिका काय असेल ? या प्रश्नावर मात्र राऊत यांनी बोलणे टाळले.