मुंबई : राज्यात सत्ताधारी असणार्या शिवसेना-भाजपाची युती मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तुटल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केली आहे. २६ जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडत भाजपावर तीव्र टिका केली. यानंतर २८ जानेवारीला विजय संकल्प मेळाव्यात भाजपाने शिवसेनेवर देवेंद्रास्त्र भिरकावले. या अस्त्राने शिवसेनेला तुमची औकात काय? हे येत्या २१ तारखेला दाखवून देऊ असे म्हणत सेनेचे जाहीर सभेत वाभाडे काढले.
भगवा झेंडा हातात घेऊन हफ्ता वसुली करता यावी, यासाठी जनतेने आम्हाला कौल दिलेला नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सुनावले. आमची लढाई शिवसेनेच्या आचारांशी आहे. या पक्षाचे विचार एकीकडे वेगळे तर आचार भलतेच असतात. अशा प्रकारचा त्यांचा कारभार आम्हाला अजिबात मान्य नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
२१ तारखेला पाणी पाजेन असा इशारा शिवसेनेला द्यायला मुख्यमंत्री आज विसरले नाहीत. मुंबई महापालिकेच्या जागावाटपात त्या जास्त मिळाव्यात, असा हट्ट शिवसेनेने केला, त्या हट्टामुळेच युती तुटली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली. आम्ही लोकांचे मनोरंंजन करत नाही. तर भ्रष्टाचारबंदी करणारे आहोत, नोटाबंदीतून आम्ही ते दाखवून दिले आहे. युती टिकावी, यासाठी पारदर्शीपणा असावा, अशी अट मी ठेवली, त्यात माझी चूक आहे का? काही जागा इकडे-तिकडे झाल्या असत्या तरी चालले असते, पण पारदर्शिकतेच्या मुद्यावर तडजोड करणार नाही, असेही ते म्हणाले. विधानसभेत युती तुटली नसती, तर कधीच मुख्यमंत्री झालो नसतो, हे त्यांनी शिवसेनेच्या लक्षात आणून दिले. शिवसेनेचा आचार आणि भ्रष्टाचारी कारभार आम्हाला मान्य नाही. २५ वर्षे महापालिका शिवसेनेच्या हातात दिल्याने मुंबईचे नुकसान झाले आहे, असेही ते म्हणाले.