मुंबई : महापालिकेने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात येणार्या पर्यटकांसाठी आकर्षक बदल केले आहेत. त्यात आठ ठिकाणी सेल्फ़ी पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत. तसेच सुशोभीकरणाच्या टप्पा क्रमांक १ मध्ये घड्याळ मनोरा, तिकीट घर, प्रसाधनगृहे यांची निर्मिती केली गेली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर व माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांनी शनिवारी (ता.६ ) सायंकाळी या उद्यानात विकसित केलेल्या सेल्फी पॉईट्स व हॅम्बोल्ट पेंग्विन दालनाची पाहणी केली. प्राणिसंग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे आधुनिकीकरण व लहान मुलांना मनोरंजनासाठी आकर्षक सेल्फी पॉईट्स याबद्दल वेंगसरकर व पंडित यांनी पालिकेचे अभिनंदन केले.
या पाहणी दरम्यान उप आयुक्त (सामान्य प्रशासन) सुधीर नाईक, संचालक (प्रभारी),वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय डॉ. संजय त्रिपाठी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आकर्षक सेल्फी पॉईट
या उद्यान व प्राणिसंग्रहालयास भेट देणार्या पर्यटक व लहान मुलांकरीता वुफी, डोरेमॉन, डोनल्ड डक, मिकी माऊस या कार्टून प्रतिकृती, जायंट पांडा, पाण्याचा कृत्रिम धबधबा, वाहत्या पाण्याच्या प्रवाहावरील लाकडी पूल, सुमारे १५ फूट उंच भू-छत्री व त्यावर तीन माकडांच्या प्रतिकृती तसेच सुप्रसिद्धसिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी नुकताच दिग्दर्शित केलेल्या मोहेंजोदारो या चित्रपटामध्ये वापरण्यात आलेली १८ फूट लांबीची कृत्रिम मगरींची आकर्षकरित्या मांडणी करण्यात आली आहे. पर्यटक व नागरिकांसाठी हा सेल्फी पॉईट आणखीन भर टाकणारा ठरला आहे.
सेल्फी पॉईंट्सजवळ सूचनाफलक
सदर प्रतिकृतींच्या समवेत पर्यटक आपली सेल्फी छायाचित्रे काढू शकतात. याचा लाभ अनेक पर्यटक घेत असून त्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आहे. परंतु, त्यापैकी काही पर्यटक सदर सेल्फी प्रतिकृतींच्या सभोवताली असलेले संरक्षक कुंपण ओलांडून त्यांच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्यांच्याकडून सदर प्रतिकृती विदृप करण्याचे प्रकारही घडत आहेत. सदर प्रतिकृती सुस्थितीत राहण्यासाठी काही प्रतिबंधक नियम सेल्फी पॉईंट्स प्रतिकृतींच्या जवळील सूचनाफलकांवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. उद्यान व प्राणिसंग्रहालयात पेंग्विन पक्षी व सेल्फी पॉईट्सची प्रबोधनात्मक ऑडिओ स्पॉट मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत पर्यटकांसाठी तयार केल्या असून सदर ऑडिओ क्लीप सुप्रसिद्ध दूरदर्शन निवेदक रत्नाकर तारदाळकर, आर. जे. विघ्नेश अय्यर व सोनिया माळी यांच्या आवाजात तयार केली आहे. सर्व पर्यटकांना या सुविधांचा उत्तम लाभ घेता यावा, यासाठी सर्व नियमांचे पालन यथायोग्यपणे करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.