
मुंबई : कर्नाटक सरकार सीमाभागातील नागरिकांवर करत असलेल्या दडपशाहीविरोधात आणि बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी आज मुंबईमध्ये काळा दिवस पाळण्यात आला. करी रोड नाका येथे आज सकाळी नऊ वाजून ३० मिनिटांनी आंदोलन करण्यात आले. सीमा संघर्ष समन्वय समिती व मराठी संघटना यांनी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध केला.
दरवर्षी एक नोव्हेंबरला सीमा भागातील नागरिकांकडून काळा दिन पाळण्यात येतो. 865 गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा, अशी मागणी यावेळी केली जाते.
आज सकाळपासूनच निपाणी, बिदर, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणांनी करी रोड नाका दणाणून गेला. कर्नाटक सरकारला काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी मुंबईत राहणारे कोल्हापूरातील नागरिकही सहभागी झाले होते. केंद्र सरकारने सीमाप्रश्न तातडीने निकालात काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
















