मुंबई : राज्यात लोकसहभागातून १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण झाला असून यामध्ये राज्यातील सर्वसामान्य जनता, पर्यावरणप्रेमी, व्यापारी, उद्योजक, स्वयंसेवी, सामाजिक संस्था, अध्यात्मिक संस्था, सिनेक्षेत्रातील मान्यवर, शासनाचे विविध प्रशासकीय विभाग आणि इतर सर्वांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या सहभागामुळेच हा संकल्प पूर्ण झाला आहे. आता वृक्ष लागवडीनंतर वृक्षसंगोपनाचे खरे आणि महत्त्वाचे काम सुरु होत असून त्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन वन सचिव विकास खारगे यांनी केले.आज सर्व प्रशासकीय विभागांकडून वृक्ष लागवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांची बैठक श्री. खारगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.श्री. खारगे म्हणाले, प्रशासकीय विभागांना वृक्ष लागवड, जतन आणि संवर्धनासाठी उपलब्ध वित्तीय तरतुदीच्या अर्धा टक्का निधी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. तसा शासन निर्णयही निर्गमित झाला आहे. विभागांनी हा अर्धा टक्का निधी उपलब्ध करून घेण्यासाठी व त्यासंबंधीचे लेखाशीर्ष निर्माण करण्यासाठी १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत वित्त विभागाकडे नस्त्या सादर कराव्यात. तसेच ज्या विभागांनी वृक्ष लागवड केली परंतु त्याची नोंद वन विभागाकडे केली नाही, त्यांनी त्याची माहिती ऑफलाईन पद्धतीने विभागाकडे कळवावी. ज्या विभागांचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट बाकी असेल त्यांनी ते उद्दिष्ट पूर्ण करावे व त्याची माहितीही वन विभागाला द्यावी. वृक्ष लागवड ही केवळ वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी आवश्यक आहे असे नाही तर यातून रोजगार आणि उत्पन्न वृद्धीदेखील अपेक्षित आहे. शिवाय यातून पर्यावरण रक्षण होत असल्याने सर्व सजीवांच्या निरोगी आयुष्यासाठीदेखील ते महत्त्वाचे आहे. हीच भावना ठेवून वनक्षेत्राबरोबर वनेत्तर क्षेत्रात वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विभागाने हाती घेतला आहे. त्याची दृष्य फलितेही दिसून येऊ लागली आहेत. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्याचे वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन २७३ चौ.कि.मी ने वाढले आहे. त्याशिवाय इतर चार क्षेत्रातही महाराष्ट्र देशात पहिले आले आहे. राष्ट्रीय वन नीतीनुसार ३३ टक्के वनक्षेत्र करण्यासाठी आपल्याला अजून १३ टक्के वनक्षेत्र वाढवणे गरजेचे आहे. यासाठी साधारणत: ४०० कोटी वृक्ष लावणे आणि जगवणे आवश्यक आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे मिशन लोकसहभागातून हाती घेण्यात आले आहे.वृक्ष लागवडीत पारदर्शकतेला महत्त्व असून ज्या विभागांनी वृक्ष लागवड केली आहे त्याची माहिती वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे गरजेचे आहे. ती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनेही नोंदवता येईल. त्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या वनाधिकाऱ्यांकडे संपर्क करावा असेही श्री. खारगे यावेळी म्हणाले. प्रत्येक विभागाने त्यांच्या आढावा बैठकीत वृक्ष लागवडीचा विषय कार्यक्रमसूचीवर घ्यावा, जिथे वृक्ष लावले तिथे स्थळ भेट देऊन लावलेल्या वृक्षाच्या संगोपनाचादेखील आढावा घ्यावा असे सांगून श्री. खारगे पुढे म्हणाले, लावलेले किती वृक्ष जिवंत राहिले याची माहिती प्रत्येक विभागाने वन विभागाला कळवायची आहे. लावलेल्या प्रत्येक रोपाचे रेकॉर्ड ठेवायचे आहे.पुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागाला त्यांचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. ३३ कोटीचे उद्दिष्ट खूप मोठे असल्याने वृक्ष लागवडीचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक आहे. विभागांनी या बाबीकडेही प्राधान्याने लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
आज दि. ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता वन विभागाकडे नोंदवल्या गेलेल्या माहितीप्रमाणे राज्यात १३ कोटी ८५ लाख ७५ हजार ६०२ वृक्ष लागले आहेत. ३३ लाख १२ हजार ६३६ लोक या मोहिमेत आतापर्यंत सहभागी झाले असून ही वृक्ष लागवड १ लाख ४५ हजार ६८३ स्थळांवर झाली आहे.