मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेतील सायन्स टॉपरला वाहन चोरीप्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जयकिशन सिंग असे त्याचे नाव असून त्याला अमली पदार्थांचे व्यसन लागले आहे. गाड्यांची चोरी करून ‘ओएलएक्स’वर विक्री केल्याच्या आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
उच्चभ्रू कुटुंबातील असणार्या जयकिशनला सोमवारी अंधेरीतून अटक करण्यात आली. त्याला २०१४-१५ मधील बोर्डाच्या परीक्षेत ९८.५०% गुण मिळाले होते. सहा महिन्यांपासून वाहनचोरी प्रकरणात अंधेरी एमआयडीसी पोलीस त्याच्या शोधात होते.
अमली पदार्थांच्या व्यसनामुळे जयकिशनने वाहने चोरण्यास सुरुवात केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार जयकिशन दुचाकींची चोरी करून ओएलएक्स’वर विक्री करायचा. अंधेरी पूर्वतील मालपाडोंगरी परिसरात कुटुंबासोबत तो राहतो. त्याचे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत. अंधेरीतील एका महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता. अत्यंत हुशार असलेल्या जयकिशनला बारावीनंतर अमली पदार्थांची सवय लागली. पदवीच्या पहिल्या वर्षी वर्गात त्याने प्रथन क्रमांक मिळवला. द्वितीय वर्षात असताना एका विषयामध्ये त्याला के.टी. लागली होती. के.टी.परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी तो आला असता त्याने गाडी चोरण्याची योजना आखली. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.