मुंबई :- मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई मनपा शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. यात दुतावासांच्या शाळा १८ जानेवारीपासून सुरु होणार असल्याचे नमूद आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. नव्या रुग्णांची संख्या देखील घटली आहे. मात्र, अन्य राज्यातील कोरोनाच्या स्थितीही भयानक आहे. तर इतर देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने मुंबईतील सर्व माध्यमांच्या, व्यवस्थापनांच्या, सर्व शाळा आणि विद्यालये, महाविद्यालये विद्यार्थ्यांकरिता १५ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व शालेय व्यवस्थापन आणि माध्यमांना तसे निर्देश पालिका शिक्षण विभागाने दिले आहेत. दुतावासांच्या शाळा १८ जानेवारी पासून सुरु करण्यास पालिकेने संमती दर्शवली आहे. मात्र कोविडबाबत खबरदारी, आरोग्य, स्वच्छता व सुरक्षाविषयक निकष पाळणे, संबंधितांना बंधनकारक केल्याची माहिती सुत्रांनी दिली. महापालिका शिक्षण विभाग यासंदर्भातील परिपत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले.
कोरोनाचा प्रसार कमी झाला असली तरी नव्या प्रकारामुळे लोकांच्या मनात भीती आहे. सध्या तरी शाळा सुरु करण्यास संमती दिलेली नाही, अशी माहिती पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आली. मात्र, १५ जानेवारीनंतर शाळा सुरु करण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिल्यास शिक्षण विभाग सज्ज असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.