मुंबई : आजच्या स्वार्थी दुनियेत निस्वार्थी व्यक्ती सापडणे विरळच. पैसे-सोने यांची भुरळ नसणारा माणूस या दुनियेत वेगळाच. परंतु या जगात अशी माणसे आहेत जी स्वतःच्या श्रमावर विश्वास ठेवतात आणि श्रमातून मिळणाऱ्या रुपयांतून स्वतःचे जीवन जगतात. एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडत असताना एका श्रमिकाने त्याला सापडलेले तब्बल 15 तोळे सोने परत दिले आणि स्वतःच्या कष्टाच्या कमाईतूनच खाईन, असा संदेश आजच्या स्वार्थी वृत्तीच्या समाजाला दिला.
याबाबतची हकीकत अशी की, डी विभाग साफसफाई खात्यातील केनडी ब्रीज चौकीमधील कामगार सुनील काशिनाथ कुंभार या सफाई कामगाराला कर्तव्यावर असताना दिनांक १२ मे २०२४ रोजी महर्षी कर्वे रोड केनडी ब्रीज जवळ अंदाजे १५ तोळे सोने मिळाले. सदर कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणामुळे त्यानी ते सोने मुकादम बाळाराम जाधव व किशोर जीतिया यांना आणून दिले. मुकादमांनी डी.बी.रोड पोलीस स्टेशन येथे या घटनेची माहिती दिली व पोलीस शिपाई श्री दीपक डावरे यांच्या ताब्यात सदर सोने देण्यात आले.
कामगाराच्या व मुकादमांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्या हेतू आज दि.१७ मे रोजी म्युनिसिपल मजदूर युनियन,मुंबईच्या वतीने सदर कामगार व मुकादमांचा डी विभाग समुप कार्यालयात सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संबंधित कामगार सुनिल कुंभार व मुकादम बाळा जाधव यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन मनपा प्रशासनाने या दोघांना मालकी हक्काचे घर देऊन त्यांचा उचीत सन्मान करावा अशी आग्रही मागणी सरचिटणीस मा.वामन कविस्कर यांनी केली. या मागणीचा सन्मान करत डी विभागाचे सहा.अभियंता मा.गाडेकर साहेब,दुय्यम अभियंता मा.परब साहेब यांनी तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी युनियनच्या सहा.सरचिटणीस प्रफुल्लता दळवी,उपाध्यक्ष महेशभाई महीडा,व मोहीते सहा.चिटणीस प्रविण भास्कर मांजलकर,माजी वाॕर्ड अध्यक्ष श्रीधर जाधव,का.सदस्य मनोज सकपाळ,मुकादम मंगेश खिनगीनकर,माजी कार्यकर्ते सुरेंद्र जाधव उपस्थित होते.
मुख्य सुरक्षा अधिकारी मा.बडेकर साहेब,समुप बाविस्कर साहेब,पर्यवेक्षक राठोड साहेब,जाधव साहेब,क.पर्यवेक्षक सुनिल मकवाना साहेब,वाघ साहेब यांनी कौतुक केले, अशी माहिती कामगार नेते प्रविण भास्कर मांजलकर यांनी दिली.