
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे डोंबिवलीतील सावित्रिबाई फुले नाटयगृह गेले दहा महिने दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. या काळात महापालिकेचे कोटयावधी रूपयांचे उत्पन्न बुडाले. हे नाटगृह सुरु करण्यासाठी प्रशासनाने अनेक तारखा जाहीर केल्या होत्या. पण दरवेळी त्या तारखेला काही नाटयगृह सुरु झाले नाही. आता सर्व काम पूर्ण झाले असून येत्या 15 जुलै पासून नाटयगृह सुरु करण्याचा मुहुर्त काढण्यात आला आहे.
फुले नाटयगृहाचा 12 वा वर्धापनदिन येत्या 28 तारखेला असून या दिवशी नाटयगृह सुरु करण्याचे योजिले होते पण आता तारीख बदलून 15 जुलै करण्यात आली आहे. 8 सप्टेंबर 2018 रोजी वातानुकुलित यंत्रणा बंद पडली म्हणून तीन महिन्यांसाठी फुले नाटयगृह बंद करण्यात आले. मात्र काम करण्यासच सहा महिने लागले व त्यानंतर तीन महिन्यांसाठी लोकसभा निवडणूकीसाठी तरण तलाव, नाटयगृहाची जागा घेतल्याने ते बंद ठेवण्यात आले होते. जी वातानुकुलित यंत्रणा नव्या पध्दतीने बसवण्यात आली असून यामुळे वीजेची बचत होईल व वातानुकुलितपण येाग्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नाटयगृहासोबत स्वच्छतागृह व इतरही कामे करण्यात आली आहेत. कल्याण डोबिवली महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी यांनी नुकतीच नाटगृहाची पहाणी केली व त्यानी नाटयगृहाचे काम पाहून समाधान व्यक्त केले. येत्या 15 तारखेपासून नाटयगृह सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व दुरुस्तीकामासाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च आला असावा असा अंदाज त्यानी व्यक्त केला.














