अलिबाग : कोकण रस्ते विकासाच्या महत्वाच्या कामांचे भुमिपूजन व विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या सावित्री नदीवरील पुलाचे लोकार्पण हा ऐतिहासिक क्षण असून, कोकण विकासासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड येथे केले. सावित्री नदीवरील नव्या पुलाच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, खासदार अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, भरतशेठ गोगावले, प्रविण दरेकर, अवधुत तटकरे,निरंजन डावखरे, संजय कदम, महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या या पुलाच्या लोकार्पणाने या दुर्घटनेत मृत झालेल्यांना एक प्रकारची श्रध्दांजली अर्पण होत आहे. तसेच स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड पर्यंतच्या रस्त्याची कामे व देशाला प्रेरणादायी असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या गावापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन हा खरोखरच एक ऐतिहासिक क्षण आहे. याचे श्रेय २१ व्या शतकातील विकसित भारत निर्माण करणारे मंत्री नितीन गडकरी यांना जाते. त्यांना आम्ही विश्वास देतो की, कोकण विकासासाठी होत असणाऱ्या रस्त्यांसाठी लागणाऱ्या जमीन संपादनाचे काम आम्ही तातडीने संपवू. यासाठी सर्व मिळून एकत्रित पाठबळ देऊ. हा महामार्ग भविष्यात कोकणाच्या विकासासाठी महत्वाचा ठरणारा असून प्रसंगी कोकणचे भाग्य बदलणारा होईल.
सावित्री नदीवरील या पुलाचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याबद्दल त्यांनी केंद्राचे आभार मानले. तसेच पूल दुर्घटनेनंतर बचाव व मदत कार्य केलेल्या सर्व घटकांचे आभार व्यक्त करुन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष पाठपुरावा करुन हे काम १६५ दिवसात पूर्ण केल्याचे सांगितले.
गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग हा माझा विभाग असल्याने महाड येथे झालेल्या या पुल दुर्घटनेची जबाबदारी माझी आहे. असे स्पष्ट करुन गडकरी यांनी विक्रमी वेळेत पूल पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच केंद्रीय व राज्यस्तरीय अभियंते, संबंधित कंत्राटदार यांचे अभिनंदन केले. सदरील पुलाची काही दिवसांपूर्वी हवाईपाहणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. कोकणच्या विकासासाठी मुंबई-गोवा रस्ता चौपदरीकरणांतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील १२ पॅकेजेसपैकी इंदापूर ते वडपाले, वीर ते भोगाव खुर्द व भोगाव खुर्द ते कशेडी घाट पर्यंतच्या रस्त्यांची कामे या तीन पॅकेजेसचे भुमिपूजन आज संपन्न होत आहे, त्याचा आनंद होत असल्याचे ते म्हणाले. तसेच आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादन महाराष्ट्र शासनाने तातडीने करुन दिल्यास डिसेंबर २०१८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महाड पुल दुर्घटना ही संवेदनशील, मनाला अस्वस्थ करणारी घटना आहे. त्यामुळे भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये या करीता त्यांच्या विभागामार्फत अशा जुन्या झालेल्या देशातील सर्वच पुलांचा सर्व्हे करुन त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या दुर्घटनेत लोकांचे प्राण वाचवू शकलो नाही, याचे दु:ख आहे. तथापि हा पूल दिलेल्या वेळेत पूर्ण करुन लोकार्पण करत असल्याचे समाधान आहे असे ते म्हणाले.
गीते म्हणाले की, कोकणच्या विकासासाठी असलेल्या रस्त्यांच्या कामामध्ये ३ हजार कोटी रुपयांची कामे रायगड जिल्हयात होत असल्याबद्दल त्यांनी गडकरींना धन्यवाद दिले. महाड दुर्घटने सारख्या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून इच्छाशक्ती असेल तर परिस्थितीवर मात करता येते असे सांगितले. महाड दुर्घटना मोठीच. परंतु त्यांने खचून न जाता पुढे काय ? या प्रश्नाची उत्तरे या नविन पुलाने दिल्याचे ते म्हणाले. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे कामही लवकर पूर्ण व्हावे. त्याने एक शल्य संपेल असे सांगून या नुतन पुलाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गडकरीजींचे आभार मानले.
श्रध्दांजली व सत्कार
कार्यक्रमाच्या प्रारंभी या दुर्घटनेतील मृतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच पूल निर्मितीसाठी कार्य केलेल्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. दुर्घटनेनंतर आपतकालिन व्यवस्था पाहणाऱ्या घटकांचाही सत्कार प्रमुख अतिथींनी केला. प्रातिनिधीक स्वरुपात झालेल्या या सत्कारामध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजीव निवतकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, वसंतकुमार मिश्रा, एस.टी.वाहनचालक संजय केदार, वाहक सुरेश जाधव यांचा सत्कारामध्ये यांचा समावेश होता.
या कार्यक्रमास माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, नागरिक, पदाधिकारी, पत्रकार, शासकीय अधिकारी,कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग दिल्ली येथील मुख्य अभियंता विरेंद्र कौल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रायगड जिल्हा पॅकेज
महाड जंक्शन (रा.म.66 वरील कि.मी.123/400) ते रायगड किल्ला (जिजाऊ माता समाधी पर्यंत व चित्त दरवाजा व हिरकणी वाडी पर्यंत) चा दोन पदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रिट रस्ता बांधणी कामाची किंमत 247.13 कोटी. एकूण लांबी 25.609कि.मी. ठळक वैशिष्टये :- काँक्रिट रस्ता 2 लेन पेव्हड शोल्डरसह, मोठे पुल 1 नग, लहान पुल 19 नग, मोऱ्या 140 नग. आंबडवे-पाचळ-मंडणगड-राजेवाडी (रा.म.क्र.66 जंक्शन) चे दोन पदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रिट रस्ता बांधणी, कामाची किंमत 412.02कोटी. एकूण लांबी 59.667 कि.मी. ठळक वैशिष्ट्ये काँक्रिट रस्ता 2 लेन पेव्हड शोल्डरसह, मोठे पुल 1 नग, लहान पुल 17 नग,मोऱ्या 324 नग, रेल्वे खालील पुल-1 नग
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजूर कामे
अलिबाग रेवदंडा रस्ता प्रा.रा.मा. 4 कि.मी. 00/00 ते 14/100 चे काँक्रिटी करण करणे, एकूण मंजूर रक्कम 10 कोटी. शिरवली माणकुले रस्त्याची सुधारणा करणे प्रा.रा.मा. 4 कि.मी. 00/00 ते 02/500, एकूण मंजूर रक्कम 10 कोटी. सुधागड तालुक्यातील वाकण-पाली-खोपोली रा.मा. 93 रस्त्याची सुधारण करणे, कि.मी. 16/00 ते 26/00 एकूण मंजूर रक्कम 4.5 कोटी. सुधागड तालुक्यातील उध्दर-कुंभरघर-महागांव-हातोंड-गों
मुंबई गोवा रस्ता चौपदरीकरण (तीन पॅकेजस्)
इंदापूर (कि.मी. 84/00) ते वडपाले (कि.मी. 108/400) एजन्सी-चेतक एटंरप्रायजेस, जयपुर, कामाची किंमत 1202.52कोटी. एकूण लांबी 26.75 कि.मी. ठळक वैशिष्टये काँक्रिट रस्ता 4 लेन पेव्हड शोल्डरसह, इंदापूर व माणगांव शहरास बायपास,उड्डाण पुल 1 नग, रेल्वे वरील पुल 3 नग, मोठे पुले 1 नग, लहान पुल 9 नग, बस थांबे 8 नग, ट्रक थांबे 1 नग. वीर (कि.मी.108/400) ते भोगाव (खुर्द) (कि.मी. 148/00) एजन्सी एल अँड टि कंपनी, मुंबई कामाची किंमत 1598.47 कोटी. एकूण लांबी38.76 कि.मी. ठळक वैशिष्टये काँक्रिट रस्ता 4 लेन पेव्हड शोल्डरसह, उड्डाण पुल 1 नग, मोठे पुल 2 नग, लहान पुल 9 नग,वाहनांसाठी ओव्हर / अंडर पास 18 नग, पादचारी पुल 3 नग. भोगाव (खुर्द) (कि.मी. 148/00) ते कशेडी घाट (कि.मी. 161/600) 1.72 कि.मी. चे दोन बोगदे व 9 कि.मी. जोड रस्ता. प्रस्तावित किंमत 1011.89 कोटी. एकूण लांबी 9.00 कि.मी. बोगद्याची लांबी1.720 कि.मी. 2 नग, पोचमार्गाची लांबी 7.28 कि.मी. दरीवरील पुलांची लांबी 680 मी. नदीवरील पुलांची लांबी 466 मी. ठळक वैशिष्ट्ये 3 पदरी 2 भुयारी रस्ते, काँक्रिट रस्ता 4 लेन जोड रस्ता.