मुंबई, (निसार अली) : संविधानाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या दलित-आदिवासी-कष्टकऱ्यांच्या तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना एकत्र येऊन संविधान दिनाच्या एक दिवस आधी रविवारी 25 नोव्हेंबरला ‘संविधान जागर यात्रा’ काढण्यात येणार आहे. देवनार ते चैत्यभूमी असा यात्रेचा मार्ग असणार आहे.
दुपारी 12 वाजता देवनार (पांजरापोळ) येथील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून यात्रेला होणार आहे. सुमन नगर – राणी लक्ष्मीबाई पार्क – खोदादाद सर्कल – सेना भवन – शिवाजी पार्क या मार्गे जाऊन चैत्यभूमी येथे संध्याकाळी 5 वाजता यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रेचे उद्घाटन प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या हस्ते होणार आहे. सांगता सभेला लोकशाहीवादी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. गतवर्षी संविधान दिनाच्या दिवशी काढलेल्या अशाच यात्रेत हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे या वर्षीच्या यात्रेलाही हजारोंच्या संख्येत लोकांनी यावे असे आवाहन संविधान जागर यात्रा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.