मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : वारली चित्रकलेच्या माध्यमातून “आरे वाचवा”चा संदेश आदिवासींकडून गोरेगाव आरे कॉलनीतील पारंपारिक घरावर देण्यात येत आहे. आरे कॉलनीत विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होत आहे. मेट्रो ३ प्रकल्पाचे कारशेड डेपोचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे जीवसृष्ट्री धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आरेतील आदिवासींनी वारलीच्या माध्यमातून ‘आरे वाचवा’ची हाक दिली आहे.
प्रसिद्ध वारली कलाकार वारली चित्रकार प्रकाश भोईर यांनी काढलेल्या रेखीव चित्रात पुलावरून जात असलेली वाहन, इमारती आणि २६/११ हल्ला दरम्यान बचाव करणारे हेलीकॉप्टर काढले आहे. आरेतील आदिवासी वास्तव्य करत असलेली १०० एकर जागा फोर्स वनच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी पाड्यातील ३ पाडे बांधित झाल्याचे भोईर यांनी सांगितले.
मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर येथील जागा फ़ोर्स वनला देण्यात आली. त्यामुळे आमच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. मात्र आम्ही या ठिकाणावरून हलणार नाही, असा पवित्रा आदिवासींनी घेतला आहे.
आरे कॉलनीत जे जे घडत ते वारली पेंटिंगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. फोर्स वन व मेट्रो कारशेड, प्राणी संग्रहालय यामुळे आदिवासी पाडे कशाप्रकारे बाधित होतात, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आमची संस्कृती हळू हळू लोप पावत आहे. आदिवासी बांधवांची संस्कृती हीच खरी ओळख आहे. ती पुसण्याचा प्रयत्न होत आहे, अशी खंत आदिवासी बांधवांनी व्यक्त केली. आम्ही नामशेष होऊ, अशी भीती प्रकाश भोईर यांनी व्यक्त केली.