रत्नागिरी : वीर सावरकरांचा विजय असो, हिंदुत्वाचा जयजयकार अशा घोषणा देत आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त कारागृह येथील वीर सावरकर स्मारक ते ऐतिहासिक पतितपावन मंदिरापर्यंत भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. राज्याचे राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही शोभायात्रेत सहभाग घेऊन लक्ष्मीचौक येथे वीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पतितपावन मंदिरात झालेल्या सहभोजन कार्यक्रमास शेकडो लोकांनी गर्दी केली.
महाराष्ट्र शासनाने वीरभूमी परिक्रमेअंतर्गत पर्यटन संचालनालय, मुंबईतील विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताहात आज शोभायात्रा व सहभोजनाने सांगता झाली. सकाळी ८ वाजता कारागृह येथे शहराच्या विविध भागांतून हिंदुत्वाची ज्योत घेऊन शेकडो सावरकर प्रेमी आणि हिंदु बंधू-भगिनी यात्रेकरिता दाखल झाले. त्यानंतर कारागृहात वीर सावरकरांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन करण्यात आले. नंतर ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेस सुरवात करण्यात आली.
यात्रेत हिंदुत्व ग्रंथ चित्ररथ, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ व रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे वीर सावरकरांच्या बालपणीचा सजीव देखावा, प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या भगिनी, हिंदु जनजागृती समितीचा राष्ट्रपुरुषांचा देखावा, पतितपावन मंदिर संस्थेचा वीर सावरकरांच्या प्रतिमेचा रथ, दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या प्रतिमेचा व सहभोजनाचा चित्ररथ सहभागी झाला. मिऱ्या येथील महिला आणि तोणदे येथील ढोल-ताशांच्या पथकाने सर्वांची मने जिंकली. भगवे ध्वज, मी सावरकर असे लिहिलेल्या भगव्या टोप्या शेकडो युवक, महिला, मुले शोभायात्रेत सहभागी झाले. यात्रेवेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जयस्तंभ येथे माऊली अॅक्वातर्फे पाणीवाटप, एसटी स्टॅंड येथे गणेश धुरी यांच्यातर्फे ताकवाटप करण्यात आले.
दानशूर भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले. हिंदुशक्ती वाढण्याकरिता व सप्तबंदीच्या बेडीतून हिंदु धर्म व्यापक होण्याकरिता वीर सावरकरांनी सहभोजनाचे कार्यक्रम सुरू केले. पहिले सहभोजन १९३० मध्ये झाले होते. या प्रकारचे सहभोजन शोभायात्रेच्या सांगतेनंतर पतितपावन मंदिरात करण्यात आले. याला शेकडो लोकांची गर्दी झाली. भोजनाकरिता आमटी-भात, गोडाचा शिरा, वांगे, पावटा व शेवग्याची सुरेख भाजी आणि ताक असा मेनू ठेवला होता. या मध्ये सर्व हिंदु बंधू-भगिनी सहभागी झाले. शोभायात्रेचे नियोजन सप्ताहाचे संयोजक रवींद्र भोवड, अॅड. बाबा परुळेकर, उन्मेश शिंदे, मंदार खेडेकर, उमेश खंडकर, अॅड. विनय आंबुलकर, मंगेश मोभारकर, मंदार खेडेकर, संदीप रसाळ, तनया शिवलकर, केशव भट, गौरांग आगाशे, संतोष पावरी, संजय जोशी, समीर करमरकर, भरत इदाते आदी मंडळींनी यशस्वीपणे केले.
या सहभोजनात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हेसुद्धा सहभागी झाले. त्यांनी सर्वांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. तसेच जेवणानंतर पत्रावळ स्वतः उचलली. मी कोणताही मंत्री आहे असे न दाखवता सामान्य व्यक्तींप्रमाणे सहभोजनात भाग घेतला. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.