नवी मुंबई, (शांताराम गुडेकर ) : महाराष्ट्रीय माणसाने उद्योग स्थापन करून राज्यासह देशाची भरभराट करावी, या ध्येयाने झपाटून प्रख्यात स्थापत्य अभियंते माधवराव भिडे यांनी २००० साली सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची स्थापना केली. ‘एकमेका साह्य करु, अवघे होऊ श्रीमंत’ हे ब्रीदवाक्य घेऊन क्लब काम करत आहे. महाराष्ट्रात या क्लबने आपल्या कामाला सुरुवात केली. आज जवळजवळ ६० चॆप्टर आणि २००० सदस्य अशी या क्लबची वाटचाल आहे. हेच स्वप्न पुढे नेण्यासाठी ऐरोली, नवीमुंबई येथे या क्लब चॆप्टरच्या कामाला सुरुवात झाली. बघता बघता एक वर्ष झाले. या निमिताने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ऐरोली चॆप्टरच्या प्रथम वर्धापनदिनानिमित व सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक इंजिनियर माधवराव भिडे यांच्या जयंतीनिमित्त पंचतारांकीत हाँटेल रामाडा, बिल्डिंग १५६, मिलिनिअम बिझनेस पार्क, नवीमुंबई, महापे येथे उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला सँटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र बगाडे, विश्वस्त विजय परांजपे, नवी मुंबई रिजन सेक्रेटरी विश्वास खैरनार, चॆप्टरचे चेअरमन प्रसाद मयेकर, मानसी मांजरेकर व अन्य ट्रस्टचे पदाधिकारी व प्रतिनिधी तसेच प्रतिष्ठीत उद्योजक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, व्हिजीटर उपस्थित होते.
या बैठकीत उद्योजकांना उद्योजक मार्गदर्शन तसेच आवश्यक मदत यासाठी विशेष प्रयत्न कसे केले जाऊ शकतात, यावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रतिष्ठीत उद्योजक व नव्याने व्यवसायात येणा-या उद्योजकांनी या मार्गदर्शन बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ट्रस्टचे ऐरोली चॆप्टरचे जनसंपर्क प्रमुख प्रकाश परुळेकर, प्रसाद मयेकर, सागर बाविस्कर, मंदार लोके आदींनी ही बैठक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.