
मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेकडून कार्यक्रमाचे आयोजन
चिपळूण: सहकार क्षेत्रातील योगदान तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि महाराष्ट्र शासनाचा सहकार गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ऍड. दीपक पटवर्धन यांचा विशेष सत्कार सोहळा बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
हा भव्य सत्कार सोहळा सकाळी १० वाजता चिपळूण शहरातील ‘सहकार भवन’ येथे संपन्न होणार आहे. ॲड. दीपक पटवर्धन यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित ‘सहकार गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे, त्यानिमित्त त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
पतसंस्था पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन:
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, चिपळूण यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला चिपळूण शहर व तालुक्यातील सर्व पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य, कर्मचारी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे. सहकार चळवळीला बळकट करणाऱ्या या महत्त्वाच्या सोहळ्याला उपस्थित राहून ॲड. दीपक पटवर्धन यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सहकार क्षेत्रातील सर्वांनी उपस्थित राहावे, अशी विनंती संयोजकांनी केली आहे.














